विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समिती
By Admin | Updated: September 19, 2014 23:41 IST2014-09-19T23:37:28+5:302014-09-19T23:41:12+5:30
अरुण वाघमोडे, अहमदनगर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे़

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समिती
अरुण वाघमोडे, अहमदनगर
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे़ विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या प्रत्येक महाविद्यालय व खासगी मान्यताप्राप्त संस्थेत प्राचार्यांच्या नियंत्रणाखाली एक समिती स्थापन करून विद्यार्थ्यांना तज्ज्ञ व्यक्तींमार्फत समुपदेशन करण्याचे सुचविण्यात आले आहे़
पुणे विद्यापीठातंर्गत पुणे जिल्ह्यासह अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात ६९६ मान्यताप्राप्त महाविद्यालय व २८७ इतक्या संशोधन संस्था आहे़ विद्यापीठातंर्गत एकूण ७ लाख ९८ हजार ८३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ विद्यार्थी दशेत अभ्यासासह इतर ताणतणाव व नैराश्यामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग निवडतात़ मात्र, ताणतणाव नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळाले तर आत्महत्येपासून ते परावृत्त होतील़ या उद्देशातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळातंर्गत प्रत्येक महाविद्यालय व मान्यताप्राप्त संस्थेत समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला़ पुणे विद्यापीठात विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सल्लागार समितीची कुलगुरु डॉ़ वासुदेव गाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली़ या बैठकीत विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी सविस्तर चर्चा झाली़ यावर प्रथम स्तरावरील उपाययोजना म्हणून महाविद्यालयात प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली एक मंच स्थापन करण्यात यावा़ मंचच्या वतीने विद्यार्थ्यांना स्फूर्तीदायक ठरेल व त्यांचे नैराश्य जाईल अशा स्वरुपाची व्याख्याने आयोजित करणे़ विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समूजन घेऊन त्यावर मार्ग काढणे आदी उपाययोजना समितीच्या वतीने राबविण्याचे विद्यापीठाने सुचविले आहे़