साई दर्शनासाठी भारतीय पेहरावात यावे
By | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:39+5:302020-12-07T04:14:39+5:30
शिर्डी : साईमंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहरावात यावे, असे आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. साईसंस्थानच्या या ...

साई दर्शनासाठी भारतीय पेहरावात यावे
शिर्डी : साईमंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहरावात यावे, असे आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
साईसंस्थानच्या या निर्णयामुळे विशेषत: महिला भाविकांची अनेक दिवसांची मागणी पूर्णत्वास येत आहे. धार्मिक स्थळीही काहीजण पर्यटनस्थळ म्हणूनच वावरत असतात. तीर्थक्षेत्रीही अनेकजण तोकडे कपडे घालून येतात. त्यामुळे तेथील पावित्र्य धोक्यात येते तसेच भाविकांच्या भावनाही दुखावल्या जातात. यामुळे मंदिर परिसरात येताना भाविकांनी भारतीय पेहरावात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
साईबाबा संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी महिला भाविकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करत भाविकांनी मंदिर परिसरात भारतीय पेहरावात यावे, असे फलक सोमवारी संस्थान परिसरात लावले. संस्थानच्या या निर्णयाचे बहुतांश भाविकांनी स्वागत केले़ देशभरात अनेक मंदिरात हाच नियम पाळण्यात येतो. ज्यांना तोकडे कपडे घालायचे त्यांनी अन्य पर्यटनस्थळी जावे किंवा बगीचात जावे, अशा प्रतिक्रिया अनेक भाविकांनी व्यक्त केल्या. तर मोजक्या भाविकांनी ही व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा असल्याची टीका केली.
देशातील प्रत्येक मंदिर, मशीद, गुरुद्वारासह सर्वच धार्मिक ठिकाणी या प्रकारचे नियम हवेत, अशी प्रतिक्रिया दिल्लीच्या एका महिला भाविकाने व्यक्त केली.