रस्त्याच्या निविदेवरुन रंगला कलगीतुरा
By Admin | Updated: August 17, 2016 00:43 IST2016-08-17T00:30:52+5:302016-08-17T00:43:46+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील प्रमुख रस्त्याच्या निविदेवरुन सध्या चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

रस्त्याच्या निविदेवरुन रंगला कलगीतुरा
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील प्रमुख रस्त्याच्या निविदेवरुन सध्या चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
१७ रस्त्यांच्या कामाची एल.बी. कुंजीर यांची ३६ कोटी ९२ लाख रुपयांची १०.१० टक्के जादा दराची निविदा डावलून मे. आर.आर.कपूर यांची ३६ कोटी ९४ लाख रुपयांची ९.९० टक्के जादा दराची निविदा सत्ताधारी नगरसेवकांनी मंजूर केली मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरनिविदा बोलविल्यानंतर कपूर यांनी २६.५७ टक्के कमी दराने म्हणजे २४ कोटी ६२ लाख रुपयांस फेर निविदा भरली असल्याने श्रीगोंदा नगरपालिकेचे १२ कोटी ३२ लाख रुपये वाचले आहेत. माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख उच्च न्यायालयात गेले म्हणून ही रक्कम वाचली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. तुकाराम दरेकर यांनी केला आहे
सर्वसाधारण सभेत अख्तर शेख यांनी चुकीच्या निविदा प्रक्रियेला विरोध केला होता व मुख्याधिकाऱ्याने फेर निविदा बोलविण्याची शिफारस केली होती. परंतु सत्ताधारी नगरसेवकांनी कपूर यांची निविदा मंजूर केली. त्या विरोधात शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून निविदा प्रक्रियेला आव्हान दिले होते. १८ डिसेंबर २०१५ रोजी न्यायालयाने या निविदा प्रक्रियेचा आढावा घेऊन शासनाला फेर टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. तसेच श्रीगोंदा नगरपालिकेने निविदा मागवून त्या उघडल्या असता ३, ११ टक्के आणि २६.५७ टक्के कमी दराच्या निविदा आल्या.
कपूर यांनी पहिल्या निविदेपेक्षा आताची निविदा १२ कोटी ३१ लाख ६२ हजार ९१६ रुपयांनी कमी भरलेली आहे. कपूर यांनी पहिल्या निविदेपेक्षा ३६.७६ टक्के दर कमी कसा केला ? याचे उत्तर सत्ताधारी नगरसेवकांनी द्यावे, असे आव्हान दरेकर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)