धर्मादाय उपायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सहआरोपी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:33+5:302021-05-15T04:19:33+5:30
मोहटा देवस्थानने मंदिराचा जीर्णोद्धार करताना सुमारे दोन किलो सोन्याची सुवर्णयंत्रणे मंदिरात पुरली. ‘लोकमत’ने ‘मोहट्याची माया’ या वृत्तमालिकेतून हा सर्व ...

धर्मादाय उपायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सहआरोपी करा
मोहटा देवस्थानने मंदिराचा जीर्णोद्धार करताना सुमारे दोन किलो सोन्याची सुवर्णयंत्रणे मंदिरात पुरली. ‘लोकमत’ने ‘मोहट्याची माया’ या वृत्तमालिकेतून हा सर्व प्रकार उजेडात आणल्यानंतर नामदेव गरड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने विश्वस्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन प्रारंभी सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल झाले आहे.
दरम्यान, याप्रकरणात याचिकाकर्ते गरड यांनी पोलिसांकडे पुरवणी तक्रार केली आहे. याप्रकरणात नगरच्या धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे ११ मे २०११ रोजीच लेखी तक्रार झाली होती. त्यानुसार चौकशी होऊन डिसेंबर २०११ रोजीच चौकशी अहवाल सादर झालेला आहे; मात्र या कार्यालयातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालावर काहीच कार्यवाही केली नाही. २०१७ मध्ये ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर मुख्यमंत्री व धर्मादाय आयुक्तांनीही चौकशीचा आदेश दिला; मात्र त्यानंतरही धर्मादाय उपायुक्त हि.रा. शेळके यांनी आजवर काहीही कारवाई केली नाही. उलट शेळके यांनी वरिष्ठांचा तोंडी आदेश आल्याचा हवाला देत मध्यंतरी ही चौकशी थांबवली. देवस्थानचा गैरप्रकार निदर्शनास आणला गेल्यानंतरही धर्मादाय उपायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी काहीही कारवाई न करता कर्तव्यात कसूर केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेळके यांनी वरिष्ठांच्या तोंडी आदेशावरुन चौकशी थांबविल्याबाबत गरड यांनी यापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडेही तक्रार केलेली आहे.
...............
मोहटा देवस्थानमधील गैरप्रकार २०११ मध्येच निदर्शनास आल्यानंतर धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने आजवर का कारवाई केली नाही हे संशयास्पद आहे. या कार्यालयाने आपली जबाबदारी टाळली व बेकायदेशीरपणे कामकाज केल्याचे सर्व पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. कर्तव्यात कसूर केल्यामुळे या अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी आहे.
- नामदेव गरड