ढगाळ हवामान, वातावरणात तीव्र उष्णता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:37+5:302021-07-12T04:14:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : ढगाळ हवामान असले, तरी अधूनमधून सूर्यनारायणाची किरणे थेट जमिनीवर येत आहेत. त्यामुळे एरवी असलेल्या ...

Cloudy weather, intense heat in the atmosphere | ढगाळ हवामान, वातावरणात तीव्र उष्णता

ढगाळ हवामान, वातावरणात तीव्र उष्णता

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : ढगाळ हवामान असले, तरी अधूनमधून सूर्यनारायणाची किरणे थेट जमिनीवर येत आहेत. त्यामुळे एरवी असलेल्या सरासरी तापमानापेक्षा नगर शहराचे जुलै महिन्यामधील तापमान उच्च राहिले आहे. गेल्या ८ दिवसांत ते सरासरीपेक्षा अधिक राहिले आहे. गत आठवड्यात नगरचे सरासरी तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे.

नगर शहरात एप्रिल महिन्यांची अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला कमाल तापमान जास्त असते. यंदा उन्हाळा जास्त तापदायक ठरला नाही. मात्र, पावसाने ओढ दिल्याने जुलै महिन्यातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ ते ५.५ अंश सेल्सिअसने वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळ्याप्रमाणे उकाडा जाणवत आहे. जुलै महिन्यातील आठ दिवसांतील कमाल तापमान प्रथमच इतके सलग अधिक राहिले आहे. नगर शहरात जुलै महिन्यात सरासरी कमाल तापमान २९.३ अंश सेल्सिअस इतके असते. नगर शहरात ५ व ७ जुलै, २०२१ रोजी कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

-----

जुलै महिन्यातील तापमान (अंश सेल्सिअस)

जुलै २०२१ - ३३.५८

जुलै २०१७ - ३१.३१३

जुलै २०१५ - ३२.२१

जुलै २०१४ - ३४.४३

जुलै २०१२ - ३३.४१

जुलै २००९ - ३३.०

---------------

का वाढले तापमान ?

जुलै महिन्यात भारतात मान्सून स्थिरावलेला असतो. आकाशात ढगाचे आच्छादन असते. त्यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जुलै महिन्यात आल्हाददायक वातावरण असते. सूर्य २१ जूनला कर्कवृत्तावर असतो. त्यानंतर, काही दिवसांनी त्याची प्रखरता उत्तरेकडे वाढत जाते. त्यामुळे उत्तर भारतात या काळात कमाल तापमान वाढते असते. सध्या अमेरिका, कॅनडामध्ये उष्णतेची लाट आलेली दिसते. तेथे उष्णतेमुळे शेकडोचे बळी गेले आहेत. याच वेळी भारतात मान्सून सक्रिय असल्याने उष्णतेचा परिणाम दक्षिणेकडे होताना दिसत नाही.

---

चालू आठवडाही तापणारच

ऑक्टोबरमध्येही मान्सून गेलेला असल्याने, भारतात ऑक्टोबरमध्ये उष्णता जाणवते. त्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो. सध्या मान्सून कमकुवत आहे. आकाशात ढगांचे आच्छादन नाही. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे सूर्याची किरणे थेट येतात. सूर्य दुपारी डोक्यावर आल्यानंतर त्याची सर्वाधिक कमाल तापमान २ तासांनी जास्त जाणवते. ही स्थिती या आठवड्यात अशीच राहणार असून, मान्सून सक्रिय झाल्यानंतर कमाल तापमानात घट होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

----------

सध्या मान्सून सक्रिय नसल्याने आकाश निरभ्र आहे. त्यामुळे कर्कवृत्तावर असलेल्या सूर्याची थेट किरणे जमिनीवर येत असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. मान्सून सक्रिय झाल्यानंतर पुढील आठवड्यात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे, तसेच पाऊसही मोठ्या प्रमाणात येईल.

- ए.एस. सोळंकी, तज्ज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

----------

Web Title: Cloudy weather, intense heat in the atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.