टाकळीमानूर: पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ परिसरात रविवारी (१४ सप्टेंबर) ढगफुटी झाली. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर,बाजरी, सोयाबीन, कपाशी आणि भाजीपाला पिके अक्षरश: पाण्याखाली गेली. चिंचपूर पांगुळ वडगांव, जोगेवाडी, मानेवाडी, ढाकनवाडी, पिंपगाव तप्पा, कुत्तरवाडी भागात जोरदार पुनरागमन केले. परतीच्या पावसाने रौद्रवतार धारण केल्याने शेतजमिनी जलमय झाल्या.
नदीवर बांधलेले बंधाऱ्यांचे पाणी शेतामध्ये शिरले आहे. मानेवाडी येथील बंधारा फुटल्याने चिंचपुर पांगुळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र जवळील अंमळनेर -पाथर्डी रस्त्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. पूल काही प्रमाणात वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
पंचनाम्याची मागणी
या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. शासनाने तात्काळ पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पिकांचे झालेले नुकसान पाहता, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.