क्लिक करा नगरचे ऐतिहासिक, नैसर्गिक सौंदर्य
By Admin | Updated: August 12, 2014 23:19 IST2014-08-12T23:04:05+5:302014-08-12T23:19:25+5:30
अहमदनगरचे अलौकिक सौंदर्य टिपण्यासाठी ‘लोकमत उमंग’ अंतर्गत व समर्थ डिजीटल लॅब यांच्या सहकार्याने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

क्लिक करा नगरचे ऐतिहासिक, नैसर्गिक सौंदर्य
अहमदनगर : अहमदनगरवर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. डोंगर-कडेकपारीतल्या निसर्गसौंदर्याने ही भूमी समृध्द झाली आहे. धार्मिकदृष्ट्या देशातील महत्वाचे श्रद्धास्थान असलेल्या या जिल्ह्याला शिवरायांच्या पुण्याईचा स्पर्श आहे तर हिरवाईने नटलेल्या या परिसराला ऐतिहासिक स्थळांनी आणि वास्तुंनी शिरपेच चढवला आहे. आपल्या या अहमदनगरचे अलौकिक सौंदर्य टिपण्यासाठी ‘लोकमत उमंग’ अंतर्गत व समर्थ डिजीटल लॅब यांच्या सहकार्याने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘जागतिक छायाचित्र दिनानिमित्त’ होणाऱ्या या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील निसर्गस्थळे/ पर्यटनस्थळे असा विषय देण्यात आला आहे. त्यात निवडल्या गेलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन ओम गार्डन येथे दिनांक २३ व २४ आॅगस्टला होईल. अहमदनगर जिल्ह्याला अलौकिक निसर्गसौंदर्य लाभलेले आहे. या सौंदर्याने नेहमीच चित्रकारांना भुरळ घातली आहे. रेहेकुरी अभयारण्य, हरिश्चंद्र गड, भंडारदरा धरण या प्रचलित स्थळांव्यतिरिक्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या पुरातन वास्तुही पर्यटकांना आकर्षित करत आहेत. याशिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या पुरातन मंदिरांनी या शहराचे धार्मिक महत्व अधोरेखित केले आहे. येथील रांगड्या माणसांपासून ते लहान-मोठ्या सणांपर्यंतचे खास वैशिष्ट्य या जिल्ह्याने जपले आहे.
अहमदनगरचे हे सौंदर्य कॅमेराबद्ध करणाऱ्या छायाचित्रकारांना व्यासपीठ देण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा हौशी व व्यावसायिक अशा दोन गटांत होणार आहे. त्यातील छायाचित्राचा आकार ८ बाय १२ इंच असावा व त्याला पांढऱ्या रंगातील माऊंट असावेत.
स्पर्धकांनी छायाचित्रास योग्य ते शीर्षक द्यावे व त्यामागे आपले नाव लिहावे, छायाचित्रावर कोणतेही संगणकीय काम केलेले नसावे. छायाचित्र स्पर्धेसाठी निवडण्याचा अधिकार निवड समितीचा असणार आहे. तर परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेसाठी निवडलेली ही छायाचित्रे या प्रदर्शनात लावली जातील. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रु. ३०००/- चे पारितोषिक, द्वितीय क्रमांक विजेत्यास रु. २०००/- व तृतीय विजेत्यास रु. १०००/- बक्षीस दिले जाईल. याशिवाय दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. इच्छुकांनी आपले छायाचित्र २१ तारखेपर्यंत ‘लोकमत’ कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्लिक करा, मदत करा
या उपक्रमाला सामाजिक कार्याची झालर देत प्रदर्शनात मांडल्या गेलेल्या छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणाऱ्या निधीतील रक्कम ‘स्रेहालय’ या संस्थेला देण्यात येणार आहे. तुम्ही कॅमेराबद्ध केलेले नगरचे सौंदर्य छोट्या बाळांच्या स्रेहालयातील दुधासाठी अर्थसाह्य करेल.