ग्रामविकास अधिकारी सरपंच यांना क्लिनचीट
By Admin | Updated: July 16, 2014 00:45 IST2014-07-15T23:32:14+5:302014-07-16T00:45:17+5:30
पारनेर : तालुक्यातील कान्हूरपठार ग्रामपंचायतीने केलेली भुयारी गटार योजना चुकीच्या पध्दतीने होऊन गैरप्रकार झाल्यानंतर

ग्रामविकास अधिकारी सरपंच यांना क्लिनचीट
पारनेर : तालुक्यातील कान्हूरपठार ग्रामपंचायतीने केलेली भुयारी गटार योजना चुकीच्या पध्दतीने होऊन गैरप्रकार झाल्यानंतर पारनेर पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचे अभियंता टी.के.चत्तर व व्ही.बी.जोशी दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. सरपंच गोकुळ काकडे व ग्रामविकास अधिकारी यांना ँमात्र क्लिनचीट मिळाली आहे.
पारनेर तालुक्यात कान्हूरपठार या मोठ्या ग्रामपंचायतीने सन २०११-१२ मध्ये भुयारी गटार पिण्याच्या पाण्याच्या योजनेवरून घेतली होती. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका असल्याचे सांगत कान्हूरपठार पतसंस्थेचे अध्यक्ष सखाराम ठुबे यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार करून गैरप्रकार व चुकीची योजना झाल्याचे म्हटले होते. ‘लोकमत’नेही कार्यकारी अभियंत्यांच्या समितीचा गोपनीय चौकशी अहवाल मिळवून ग्रामपंचायतीने केलेल्या चुकीचा वृत्तमालिकेव्दारे पर्दाफाश केला होता.
नगर जि.प.चे कार्यकारी अभियंता व श्रीगोंदा येथील अभियंता समितीने चौकशी केल्यानंतर यात ७२ हजार रूपयांचा गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेऊन पाण्याच्या नळयोजनेवरून गटार लाईन केल्याचे चौकशीत स्पष्ट केले होते. दरम्यान, त्यानंतर महाराष्ट ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या फेर चौकशीनंंतर यामध्ये गटार लाईन पिण्याच्या पाण्याच्या नळयोजनेवर टाकल्याची तांत्रिक चूक धरीत पारनेर पं.स.मधील शाखा अभियंता जोशी व चत्तर हे दोषी असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
(तालुका प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीला वेठीस धरण्याचा प्रयत्न
तक्रारदार सखाराम ठुबे हे सामाजिक कार्यकर्ते नसून कान्हूरपठार पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. कान्हूरपठार येथे विकास कामे चालू असताना त्यावेळी पहायचे नाही व काम पूर्ण झाल्यावर मुद्दाम तक्रारी करून गावातील विकास कामांना विरोध करून ग्रामपंचायतीला वेठीस धरण्याचा उद्योग त्यांनी चालविला आहे. सरपंच म्हणून यात माझा कोणताही तांत्रिक संबंध नसताना मला यात गोवण्याचा प्रयत्न झाला. पण मी यात दोषी नसल्याचे सिध्द झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत ज्यांचा पूर्र्ण धुव्वा झाला तीच मंडळी आता कान्हूरपठारची बदनामी करीत आहेत.
- गोकुळ काकडे, तत्कालीन सरपंच, विद्यमान उपसरपंच, कान्हूरपठार
सरपंच काकडे यांना दिलासा
सरपंच गोकुळ काकडे व ग्रामविकास अधिकारी यांचा तांत्रिक गोष्टीत सहभाग नसल्याने ते या प्रकरणात दोषी होऊ शकत नाहीत, असे चौकशी अहवालात म्हटले आहे. यामुळे तत्कालीन सरपंच काकडे यांना या अहवालातून निर्दाेष ठरविल्याने दिलासा मिळाला आहे. पारनेर पंचायत समितीने हा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला असून आता ‘त्या’ अभियंत्यांवर काय कारवाई होते? याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
७१ हजाराचा भरणा
श्रीगोंदा येथील अभियंत्यांनी केलेल्या फेरमुल्यांकन चौकशीत कान्हूरपठार ग्रामपंचायतीवर ७१ हजार २६८ रूपये गैरप्रकार दाखविला होता. ती रक्कम ग्रामपंचायतीने भरणा केला असल्याचे अहवालात म्हटले आहे.
दोषी नाही
कान्हूरपठार ग्रामपंचातमधील भुयारी गटार व इतर चौकशी प्रकरणी तांत्रिक मुद्दा निघाला होता. यात सरपंच गोकुळ काकडे व ग्रामविकास अधिकाऱ्याची कोणतीही चूक नसून अभियंते यामध्ये दोषी ठरविले आहेत. त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.
- किरण महाजन, गटविकास अधिकारी, पारनेर