नगरची एमआयडीसी खड्ड्यात
By Admin | Updated: July 8, 2014 00:30 IST2014-07-07T23:27:19+5:302014-07-08T00:30:14+5:30
अहमदनगर: येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत़
नगरची एमआयडीसी खड्ड्यात
अहमदनगर: येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत़ त्यामुळे मालवाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे रस्त्यांची दुरुस्ती करावी,अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे़
नागापूर औद्योगिक वसाहतीत पिण्याच्या पाण्याची बोंब आहे़ अनियमित पाणीपुरवठा होत आहे़ विजेचा लपंडावही सुरू आहे़ त्यात आता रस्त्यांतील खड्डयांची भर पडली आहे़ रस्त्यांत मोठे खड्डे पडले आहेत़ रस्त्यांत खड्डे कि खड्डयात रस्ते, अशी अवस्था झाली आहे़ त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे़ रस्त्यांच्या दुरुस्तीची वेळोवेळी मागणी उद्योजकांनी केली़ मात्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दखल घेतली जात नसून, रस्त्यांची मलमपट्टी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे़ पायाभूत सुविधांच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचा कर उद्योजकांकडून वसूल केला जातो़ जमा झालेल्या करातून रस्त्यांची साधी दुरुस्ती होत नाही़ त्यामुळे वसाहतीतील जवळपास सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे़
औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने वसाहतीत पायाभूत सुविधा पुरविल्या जातात़ त्याबदल्यात उद्योजकांकडून कर वसुली केली जातो़ कर न भरल्यास उद्योजकांवर कारवाई होते़ परंतु सुविधा पुरविण्याकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत असून, रस्त्यांची पुरती वाट लागली आहे़ वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो़
कामानिमित्त वसाहतीत ये-जा करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे़ सकाळी व सायंकाळी रस्त्यांवर मोठी गर्दी होते़ परंतु रस्त्यांत खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात. याशिवाय मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची ये- जा सुरू असते़ अवजड वाहनांमुळेही रस्त्यांत खड्डे पडले असून, वेळीच दुरुस्ती होत नसल्याने उद्योजकही त्रस्त आहेत़ रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)
अभियंत्यांचीही बदली
येथील औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयातील अभियंता पाटील यांची बदल झाली़ त्यांची बदली होऊन एक महिना उलटून गेला़ मात्र त्यांच्या जागी अजूनही नवीन अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली नाही़ त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी कुणाकडे करायची,असा प्रश्न उद्योजकांना भेडसावत आहे़
वसाहतीत रस्त्यांत मोठे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे़ वाहने बाहेर पडण्यास विलंब होत आहे़ याविषयी औद्योगिक विकास महामंडळाकडे वेळोवेळी मागणी केली़ मात्र दखल घेतली जात नाही़
- संजय बंदिष्टी, उद्योजक