शहर शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST2021-03-10T04:22:20+5:302021-03-10T04:22:20+5:30
अहमदनगर : महापौर पदाची निवडणूक तोंडावर असतानाच शहर शिवसेनेत पुन्हा गटबाजी उफाळून आली आहे. स्थायी समिती सभापती राष्ट्रवादीला, तर ...

शहर शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली
अहमदनगर : महापौर पदाची निवडणूक तोंडावर असतानाच शहर शिवसेनेत पुन्हा गटबाजी उफाळून आली आहे. स्थायी समिती सभापती राष्ट्रवादीला, तर महापौर पद सेनेला, असे ठरलेले असताना सेनेच्या एका गटाने विजय पठारे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांंगितल्याचा गंभीर आरोप उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.
सेनेला स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. यावेळी सेनेचे स्थायी समिती सदस्य प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, शाम नळकांडे हे अनुपस्थित होते. त्यांच्या या गैरहजेरीमुळे सेनेते फूट पडली. यावरून सेनेच्या एका गटाने थेट मातोश्री गाठली व संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांची तक्रार केली. असे असताना दुसऱ्या गटाने कोरेगावकर यांचे समर्थन करत सभापतीपद राष्ट्रवादीला, तर आगामी महापौरपद सेनेला, असे ठरले असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे जाहीर केले आहे. सहयोगी पक्षाशी वाटाघाटी होऊनही सेनेकडून सभापती पदासाठी अर्ज दाखल केला गेला. तसेच वरिष्ठांनी सांगूनही अर्ज मागे घेण्यास टाळाटाळ केली, असे लहामगे यांचे म्हणणे आहे. तसेच महापालिकेत शिवसेनेला सत्ता मिळूच नये, यासाठी हे चालले आहे का? याचा सूत्रधार शोधावा. पक्षश्रेष्ठीनी जातीने लक्ष घालून पक्ष विरोधी कारवाया करून वरिष्ठ नेत्यांना बदनाम करणार्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी लहामगे यांनी केली आहे.
महापालिकेत सेनेच्या नगरसेवकांनी कल्याण रोडवरील पाणीप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला. कल्याण रोड परिसरात सेनेचे शाम नळकांडे, सचिन शिंदे हे दोन नगरसेवक आहेत. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिंदे व नळकांडे हे दोघे गैरहजर होते. सेनेचे माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी आंदोलनाचा इशारा देताना नळकांडे यांना सोबत घेतले. सेनेचे या भागातील नगरसेवक शिंदे यांनी स्वतंत्र निवेदन काढून आंदोलनाचा इशारा दिला असून, या प्रभागातही सेनेच्या नगरसेवकांत फूट पडली असून, महापौर पदाच्या निवडणुकीमुळे सेनेतील दुरावा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
....
- मी पक्षाचा पाईक आहे. नेत्यांशी संपर्क ठेवून पक्ष वाढविणे हे आपले काम आहे. त्यामुळे मला सर्व सारखेच आहेत. नगर शहर शिवसेनेत गटतट नाहीत.
- भाऊ कोरेगावकर, संपर्कप्रमुख, शिवसेना
......