नगर मनपा निवडणूक २०१८ : भाजपच्या इच्छुकांची यादी मुंबईला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 12:19 IST2018-11-14T12:19:34+5:302018-11-14T12:19:53+5:30
महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे दोन दिवसात तब्बल २६७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

नगर मनपा निवडणूक २०१८ : भाजपच्या इच्छुकांची यादी मुंबईला
अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे दोन दिवसात तब्बल २६७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. मंगळवारी प्रभाग १३ ते १७ या पाच प्रभागासाठीच्या मुलाखती झाल्या. दुसऱ्या दिवशीही वाजत-गाजत आणि मोटारसायकल रॅली काढून इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन केले. मुलाखती दिलेल्या इच्छुकांची यादी घेऊन प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर मंगळवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले आहेत.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी, कोअर कमिटीचे सदस्य तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी, प्रा. भानुदास बेरड, किशोर बोरा, सुनील रामदासी यांनी या मुलाखती घेतल्या. दुसºया दिवशी उर्वरित पाच प्रभागांसाठी ९० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. पहिल्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ ते ८ प्रभागांसाठी ११७ जणांनी मुलाखती दिल्या होत्या. त्याच दिवशी सायंकाळ ते रात्री उशिरापर्यंत ९ ते १२ प्रभागासाठी ६० जणांनी मुलाखती दिल्या.
दुसºया दिवशी प्रभाग १३ ते १७ साठी ९० जणांनी मुलाखती दिल्या. अशा एकूण २६७ जणांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती खा. दिलीप गांधी यांनी सांगितली.
मंगळवारी दुपारीच मुलाखत प्रक्रिया संपली. त्यानंतर कोअर कमिटीने अर्जांची छाननी केली. इच्छुकांची चाळणी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांची यादी घेऊन प्रदेश सरचिटणीस ठाकूर मुंबईला रवाना झाले.
मुख्यमंत्री आणि प्रदेश भाजपाकडून या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. दोन दिवसात उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
सर्वे हा सर्वेसर्वा नाही
सर्वे हा सर्वेसर्वा नाही. ती एक मार्गदर्शन करणारी प्रक्रिया आहे. सर्वे, सोशल इंजिनिअरिंग, कोअर कमिटीचा निर्णय यातून उमेदवार निवडले जाणार आहेत. आता युती-बिती काही होणार नाही. युतीचा विषय संपला आहे. शिवसेनेने केलेली चर्चा ही व्यक्तिगत पातळीवर होती, ती पक्षस्तरावर नव्हती. त्यामुळे त्या चर्चेला अर्थ नाही, असे शहर जिल्हाध्यक्ष तथा खा. दिलीप गांधी यांनी मंगळवारी माध्यमांना सांगितले. ते म्हणाले, भाजपात प्रभाग क्रमांक १५ मध्ये सोळा इच्छुक बरोबर फिरले. त्यापैकी चार जणांना उमेदवारी द्या, अन्य त्यांचा प्रचार करणार आहेत. असे फक्त भाजपातच होऊ शकते. विकास झाला पाहिजे, हीच सर्व इच्छुकांची भावना होती, असे खा. गांधी म्हणाले.