शहरातील हातगाड्या, टपऱ्या हटविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:21+5:302021-07-27T04:22:21+5:30
अहमदनगर: शहरातील अतिक्रमणाविरोधात महापालिकेने मोहीम उघडली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभ्या असलेल्या फळविक्रेत्यांच्या हातगाड्या सोमवारी ...

शहरातील हातगाड्या, टपऱ्या हटविल्या
अहमदनगर: शहरातील अतिक्रमणाविरोधात महापालिकेने मोहीम उघडली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभ्या असलेल्या फळविक्रेत्यांच्या हातगाड्या सोमवारी हटविण्यात आल्या. लॉकडाऊननंतरची व दोन वर्षांतील महापालिकेची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. ही कारवाई पुढील एक महिनाभर राबविण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त शंकर गोरे सोमवारी सकाळी मोठ्या फौजफाट्यासह जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून कारवाईला सुरुवात झाली. या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने फळविक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या असतात. त्या पथकाने हटविल्या. कारवाईचे पथक दाखल झाल्याने फळविक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. ही कारवाई तेथून पुढे असलेल्या माळीवाडा वेशीपर्यंत पोहोचली. माळीवाडा वेस चौकातील फळविक्रेत्यांच्या हातगाड्या काढण्यात आल्या. या मार्गावर काही बंद पडलेल्या टपऱ्या होत्या. त्या पथकातील कर्मचाऱ्यांनी उचलून घेतल्या. त्यानंतर विशाल गणपती मंदिर परिसर, पंचपीर चावडी मार्गे पथक माणिक चौकात दाखल झाले. पथक दाखल होताच विक्रेत्यांनी स्वत:हून हातगाड्या काढून घेतल्या. कापडबाजारातील एमजी रोडवर दुकानांसमोर कपडे, झाडू व इतर साहित्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
अतिक्रमण निर्मूलन पथक पुढे निघून गेल्यानंतर मागे पुन्हा फळविक्रेते हातगाड्या लावतात. त्यामुळे पथकाने दुपारनंतर पुन्हा वरील सर्व मार्गांवर कारवाईची मोहीम राबविली. त्यामुळे फळविक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. महापालिकेच्या कारवाईमुळे शहरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे झाले आहेत. कारवाईच्यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख उपभियंता के. वाय. बल्लाळ, सहायक संचालक वैभव जोशी, क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, अर्जुन जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
......
वाहने जप्तीची मोहीम आजपासून
महापालिकेने रस्त्यांच्या बाजूला उभे असलेले नादुरुस्त वाहने काढून घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली हाेती. मनपाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय रोड, हातमपुरा, सर्जेपुरा ते आयकर भवन मार्गाची पाहणी केली. या मार्गावर वाहने उभी असल्याचे आढळून आले. वाहनमालकांना वाहने काढून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या असून, मंगळवारी सकाळी रस्त्यावरील नादुरुस्त वाहने जप्त करण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
..
सूचना : फोटो २६ महापालिका नावाने आहे.