शहर अंधारात!

By Admin | Updated: June 11, 2014 00:19 IST2014-06-10T23:48:00+5:302014-06-11T00:19:07+5:30

अहमदनगर : नगर शहर व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजखांब उन्मळून पडले. तसेच वीजवाहक तारा तुटल्यामुळे सोमवारची रात्र शहरवासीयांना अंधारात काढावी लागली.

City darkness! | शहर अंधारात!

शहर अंधारात!

अहमदनगर : नगर शहर व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजखांब उन्मळून पडले. तसेच वीजवाहक तारा तुटल्यामुळे सोमवारची रात्र शहरवासीयांना अंधारात काढावी लागली. युद्धपातळीवर यंत्रणा राबवून महावितरणने मंगळवारी काही भागांतील वीजपुरवठा सुरळीत केला.
सोमवारी रात्री पावसाने वादळी वाऱ्यासह शहराला झोडपून काढले. त्याआधी प्रचंड वादळामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यातील काही वीजवाहक तारांवर पडल्याने अनेक ठिकाणचे खांब कोलमडले. तसेच तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. नुकसान मोठे असल्याने शहरातील अनेक भागांत रात्रभर वीज नव्हती. अकरा केव्ही क्षमतेच्या नालेगाव उपकेंद्राला पुरवठा करणाऱ्या वीजवाहक तारांवर मोठे लिंबाचे झाड कोसळल्याने उच्चदाबाचे ५ खांब जमिनीवर आले. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच विस्कळीत झाली. त्या उपकेंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या लालटाकी, दिल्लीगेट, सिव्हील एक्स्प्रेस या फिडरवरील सर्व वीजपुरवठा तातडीने खंडित झाला. तसेच शहरांतर्गत व उपनगरांत उच्चदाबाचे एकूण १० व लघुदाबाचे ४२ खांब पडल्याने नालेगाव, सिव्हील, दिल्लीगेट, मार्केट यार्ड, कापड बाजार, माळीवाडा, सारसनगर, कल्याण रोड, बोल्हेगाव, नवनागापूर, एमआयडीसी, वसंत टेकडी, औरंगाबाद रस्ता परिसर रात्रभर अंधारात होता. (प्रतिनिधी)
१०० कर्मचाऱ्यांचा ताफा
विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांपासून इतर कुशल, अकुशल अशा १०० कर्मचाऱ्यांचा ताफा युद्धपातळीवर यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी व्यस्त होता. सोमवारची रात्र अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी जागून काढली. तारांवर पडलेली झाडे तोडून बाजूला करणे, खांब बदलणे, नवीन तारा टाकणे ही कामे मंगळवार दिवसभर सुरू होती. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या विस्कळीतपणात नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
गांधीनगरमध्ये एकाचा मृत्यू
बोल्हेगावमध्ये गांधीनगर भागातील बबन रानबा गाडे (वय ३४) यांचा वादळात मृत्यू झाला. वादळामध्ये घराचे पत्रे
उडू नयेत म्हणून ते खांबाला
धरून बसले होते. जोराचा वारा आल्याने घरावरील पत्रे उडाले आणि ते खांबासह दीडशे फुटावर उडाले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे दोन मुले, दोन भाऊ,आई-वडील असा परिवार आहे.
1रेसिडेन्सिअल हायस्कूलसमोरील पोलीस कल्याण केंद्राजवळील मोठे झाड रस्त्यावर पडले.
2सिद्धीबागेतील अनेक झाडांचे नुकसान झाले. काही झाडे खाली पडली.
3विश्रामबाग शाळेतील झाडाच्या फांद्या तुटून खाली पडल्या. सबजेल चौकात देवीच्या मंदिरासमोर वीज तारा रस्त्यावर पडल्या होत्या.
4जुन्या महापालिकेच्या आवारातील एक झाड कोसळले. अग्निशमन दल आणि मोटार व्हेईकल विभागाच्या परिसरातील झाडेही उन्मळून पडली.
5नालेगाव भागात लांडे वस्तीमधील जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाले. जनावरांच्या अंगावरही पत्रे कोसळले.
6नगर तालुक्यातील नागरदेवळे, कापुरवाडी, शहरातील भिस्तबाग नाका परिसरातील घरांचे पत्रे उडाले. अनेकांच्या घरांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या.
7संपूर्ण शहरात झाडे कोसळल्याने दिवसभर रस्त्यावर आडवी पडलेली होती. तसेच विजेचे खांबही वाकले होते. यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.
8अनेक नेत्यांचे शहरात लागलेले फ्लेक्स एका रात्रीतून फाटले. लोखंडी सांगाडाही कोसळला.
9भिंगार शहरातही अनेक घरांची पडझड झाली.
नगर शहरातील सावेडी उपनगरात तासाभरात तब्बल ४५ मिमी पाऊस झाला. शहराच्या मध्यभागी ही आकडेवारी २८ आहे. परिसरातील मंडलांमध्येही चांगला पाऊस झाला आहे. ६५ मिमी पाऊस झाल्यास तो अतिवृष्टी म्हणून जाहीर केला जातो. पाथर्डी येथे ३१ मिमी पाऊस झाला.

Web Title: City darkness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.