शहर बस महासभा गाजवणार
By Admin | Updated: June 29, 2014 00:27 IST2014-06-28T23:42:27+5:302014-06-29T00:27:41+5:30
अहमदनगर: शहर बससेवेचा विषय ५ जुलै रोजी होणाऱ्या महासभेसमोर चर्चेला येणार आहे. शहर बससेवेचा विषय महासभेत चर्चेला घ्यावा
शहर बस महासभा गाजवणार
अहमदनगर: शहर बससेवेचा विषय ५ जुलै रोजी होणाऱ्या महासभेसमोर चर्चेला येणार आहे. शहर बससेवेचा विषय महासभेत चर्चेला घ्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केल्यानंतर महापौर संग्राम जगताप यांनी पुरवणी विषय घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.
शहरातील नागरिकांच्या सोयीकरीता प्रसन्ना पर्पल मोबालिटी संस्थेने शहरात बससेवा सुरू केली. वर्षभर सेवा सुरळीत चालली. नंतर तोटा होत असल्याचा पत्रव्यवहार संस्थेकडून महापालिकेकडे सुरू झाला. वाहतूक पोलीस, जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बांधकाम विभाग आणि राज्य परिवहन महामंडळाशी चर्चा करून महापालिकेने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. करारनाम्यानुसार संस्थेला महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावयाची आहे. पण महापालिकेने दाखविलेल्या जागा संस्थेला योग्य वाटत नसल्याने भाडोत्री जागा घेऊन संस्थेने सेवा सुरू केली. संस्थेने महापालिकेकडे जागा भाडे मागितले. स्थायी समितीने दरमहा ६० हजार रुपये भाडे व मागील १५ लाख ६० हजार देण्यास जून २०१३ मध्ये संमती दर्शविली. महासभेनेही त्याला मान्यता दिली. संस्थेच्या तोट्याची शहानिशा करण्यासाठी महापालिकेचे दोन अधिकारी नियुक्त करण्यात आले. त्यांच्या अहवालानुसार संस्थेला तोट्यापोटी २ लाख ९६ हजार दरमहा देण्यास महासभेने मान्यता दिली. त्यानुसार मार्च २०१४ अखेर महापालिकेने संस्थेला नुकसान भरपाई दिली. तरीही तोटा असल्याचे सांगत संस्थेने दरमहा ७ लाख रुपये आणि आठ बसेस हलविण्याची परवानगी द्यावी, असे पत्र महापालिकेला दिले. स्थायी समितीने संस्थेचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. संस्था महापालिकेस वेठीस धरत असून कायदेशीर कारवाई करावी असा निर्णय स्थायी समितीने घेतला. महापालिकेनेही १७ जून रोजी बससेवा बंद करू नये म्हणून संस्थेला कळविले. पण असे असतानाही संस्थेने १८ जून पासून बससेवा बंद केली आहे.
आर्थिक तोट्याचे कारण त्यासाठी संस्थेने दिले आहे. बससेवा बंद केल्याने महापालिकेच्यावतीने वकिलाच्या सल्ल्यानुसार प्रतिदिन एक हजार रुपये दंड का करू नये अशी कारणे दाखवा नोटीसही पाठविलेली आहे. बससेवा सुरू करावी यासाठी महापौर जगताप व यंत्र अभियंता निकम यांनी विनंती केली पण संस्थेने सेवा सुरू केली नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने त्यांनी बससेवा सुरू करण्याची मागणी केलेली आहे. याबाबतचा प्रस्ताव मोटार वाहन विभागाने तयार केला. उपायुक्त व आयुक्तांच्या मान्यतेनंतर हा विषय महासभेसमोर ठेवण्याचा निर्णय झाला.
(प्रतिनिधी)
बससेवेसाठी तीन संस्थांची तयारी
बससेवा सुरू करण्यासाठी शहरातील तीन संस्थांनी तयारी दर्शविली आहे. या संस्थेने महापौर संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली असून ती सकारात्मक झाली. त्यामुळे नव्या संस्थेमार्फत शहरात बससेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यावरही महासभेत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रसन्ना संस्थेच्या संचालकांनी शनिवारी महापौर संग्राम जगताप यांची भेट घेतली. तोटा नसतानाही नुकसान भरपाई मागितली आहे. मात्र, इतर दोन संस्थांनी शुक्रवारपर्यंत महापौरांशी संपर्क करून बससेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. शनिवारी आणखी एक संस्था पुढे आली. पूर्वीच्या संस्थेबाबत निर्णय घेऊन नवीन संस्था नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महासभेच्या निर्णयानंतर त्यासाठी निविदा मागविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
निर्णयाकडे लक्ष
महापौर कार्यालयाने बुधवारी ५ जुलै रोजी होणाऱ्या महासभेचा अजेंडा तयार केला. त्यात शहर बसचा विषय नव्हता.
नगरसेवक व नागरिकांच्या मागणीनंतर महापौर कार्यालयाने पुरवणी म्हणून शहर बसचा विषय चर्चेसाठी महासभेसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला. या सभेत प्रसन्नाबाबत सकारात्मक निर्णय होतो की नवीन संस्था नियुक्तीला मंजुरी दिली जाते याची प्रतीक्षा नगरकरांना आहे.