आदिवासी, भटक्या समाजातील नागरिकांना मिळणार कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:06+5:302021-08-15T04:23:06+5:30

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासी, भटक्या समाजासह दारिद्र्य रेषेखाली वंचित समूहातील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आरोग्य विभागाने ...

Citizens of tribal and nomadic communities will get corona vaccine | आदिवासी, भटक्या समाजातील नागरिकांना मिळणार कोरोना लस

आदिवासी, भटक्या समाजातील नागरिकांना मिळणार कोरोना लस

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासी, भटक्या समाजासह दारिद्र्य रेषेखाली वंचित समूहातील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. गावोगावी लसीकरणाचे नियोजन करताना पिवळे आणि अंत्योदय रेशनकार्डधारकांना ठरावीक मात्रा राखीव ठेवण्यात येणार आहेत. वंचित समूहातील नागरिकांचे प्रबोधन करुन लसीकरणासाठी तयार केले जाणार आहे. गावपातळीवर ज्यांची चलती आहे त्याच नागरिकांना लसीकरण होत असून उपेक्षित समाजातील नागरिक लसीकरणापासून वंचित असण्याकडे ‘लोकमत’ (७ ऑगस्ट) च्या वृत्तामधून लक्ष वेधले होते.

पंचायत समितीच्या मासिक बैठकीमध्ये पंचायत समिती सदस्य नानासाहेब ससाणे यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताचा संदर्भ देऊन ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांसाठी लसीकरण माेहीम राबविण्याची मागणी केली. कोरोनामुक्त समाजासाठी वंचित समूहातील नागरिकांचे प्रबोधन करून लसीकरण करून घेण्याचीही आग्रही मागणी सदस्य ससाणे यांनी केली. मागणीची दखल घेऊन आरोग्य विभागाकडून त्याप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे. शुक्रवारी घोटवी (ता. श्रीगोंदा) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस देण्याचे नियोजन होते. त्यामध्ये ३० डोस पिवळे आणि अंत्योदय रेशनकार्ड धारकांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. या नागरिकांना लसीकरणासाठी निरोप देण्याची जबाबदारी स्थानिक आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांना देण्यात आली आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाचे नियोजन याप्रमाणे करण्याच्या सूचना पंचायत समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत.

----

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमात पिवळे आणि अंत्योदय रेशनकार्डधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे. दिव्यांग आणि दुर्धर आजारामुळे बिछान्यावर असलेल्या नागरिकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभाग करणार आहे. आदिवासी समाज घटकांचे लसीकरणासाठी प्रबोधन करण्यात येईल.

नितीन खामकर,

तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, श्रीगोंदा

-----

१४ श्रीगोंदा न्यूज

Web Title: Citizens of tribal and nomadic communities will get corona vaccine