काष्टीत सरपंचपद निवडीचा पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:01+5:302021-04-09T04:22:01+5:30
काष्टी : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील सरपंचपद निवडीत जात प्रमाणपत्रावरून पेच निर्माण झाला आहे. सरपंचपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी ...

काष्टीत सरपंचपद निवडीचा पेच
काष्टी : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील सरपंचपद निवडीत जात प्रमाणपत्रावरून पेच निर्माण झाला आहे. सरपंचपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्याने जात प्रमाणपत्र मुदतीत दाखल केलेले नाही, अशी तक्रार माहिती सेवा समितीचे तालुकाध्यक्ष सुभाष चौधरी यांनी तहसीलदार प्रदीप पवार यांच्याकडे केली आहे.
१७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत भाजपच्या जयश्री पवार या अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. मात्र त्यांनी जात प्रमाणपत्र निवडणूक झाल्यापासून मुदतीत जमा केलेले नाही. त्यामुळे जयश्री पवार या कायदेशीरपणे अपात्र झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना सरपंच निवडीत भाग घेता येणार नाही, असे सुभाष चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र जयश्री पवार यांना शुक्रवारी (दि.९) सरपंचपदाच्या बैठकीसाठी अजेंडा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या सरपंचपदासाठी पात्र आहेत, असा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे या निवडीत दोलायमान परिस्थिती निर्माण झाली आहे.
--
जातवैधता प्रमाणपत्र
अर्ज निकाली..
जयश्री अमोल पवार यांचे माहेरचे नाव जयश्री बबन पारधी असे आहे. जातपडताळणी समितीने २०१९ मध्ये जातवैधता प्रमाणपत्रासाठी जयश्री बबन पारधी यांनी केलेला अर्ज निकाली काढला आहे. त्या महादेव कोळी नसल्याचे जातपडताळणी समितीच्या अभिप्रायानुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जयश्री पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.