चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम, अभ्यासाचाच पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:31+5:302021-07-12T04:14:31+5:30
----------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ...

चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम, अभ्यासाचाच पडला विसर
-----------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. परंतु, पहिली ते चौथीच्या मुलांना बळजबरीने मोबाईलसमोर बसावे लागते. उन्हाळ्याच्या सुट्टीप्रमाणे चिमुकल्यांची धमाल सुरू असून, त्यांना साधी अक्षर ओळखही झालेली नाही. त्यांना आता अभ्यासाचाच विसर पडला असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. असे असले तरी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा भरविणे अशक्य आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका मुलांना आहे, असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चिमुकल्यांना विशिष्ट अंतरावर जरी बसविले तरी ते एकमेकांच्या संपर्कात येणार आहेत. त्यामुळे हे वर्षे या चिमुकल्यांचे घरी जाणार आहे. घरी बसल्या मुलांना ऑनलाईनच्या माध्यमातून बाराखडी व अक्षर ओळख करून देण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे.
पहिली ते चौथीच्या मुलांना बळजबरीने मोबाईल समोर बसावे लागते. गुरुजी काय शिकवितात, याकडे त्यांचे लक्ष राहत नाही. वर्गात बसवून गुरुजी त्यांच्याकडून तयारी करून घेतात. पाठांतर घेता येते. परंतु, ऑनलाईनद्वारे ते शक्य होताना दिसत नाही. पालकांनी सांगून विद्यार्थी ऐकत नाहीत. काही ना काही कारण देत अभ्यास करण्यास नकार देतात. गुरुजींनी दिलेला अभ्यासही विद्यार्थी करत नाहीत. अभ्यास पूर्ण केला तरी तो पाठवायचा कसा, त्यात असलेल्या चुका दुरुस्त कशा करायच्या, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. अशा विद्यार्थ्यांना अजून अक्षर ओळखही झालेली नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीप्रमाणे सध्या हे विद्यार्थी धमाल करताना दिसतात. शाळेबाबत विचारले असता शाळेला सुट्टी आहे, असे उत्तर मिळते. चिमुकले सध्या सुट्टीच्याच मूडमध्ये असल्याने त्यांना अभ्यासाचा विसर पडला आहे. त्यामुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे काही पालक सांगतात.
.....
अक्षर ओळख होईना
पहिली, दुसरीच्या मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. परंतु, त्यांची शाळा भरलेली नाही. काही शाळा ऑनलाईन शिकवित आहेत. परंतु, विद्याथ्यांना ऑनलाईन शिकवलेले समजत नाही. मोबाईलसमोर हे विद्यार्थी बसत नाहीत. बळजबरीने बसविले तरी त्यांचे मन लागत नाही. मोबाईल सुरू ठेवून चिमुकले दुसरे काही तरी करीत बसतात. पालकांनाही त्यांच्यासमोर बसायला वेळ नसतो. त्यामुळे चिमुकल्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र आहे.
..
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळेला सुट्टी असल्याने मुले अभ्यास करत नाहीत. अभ्यासाला बसविले तरी काही ना काही कारण सांगत ते अभ्यास करणे टाळतात.
अ- गुरुजींनी शिकवलेले समजले नाही, अभ्यास कसा करू
ब- मोबईलची रेंज गेली हाेती. त्यामुळे मला समजले नाही
क- डोळे व डोके दुखत असल्याचे कारण तर नेहमीच सांगितले जाते
ड- अभ्यासाला बसविल्यास कंटाळा तो ही एक कारण असते
......
पालकांनी घरातच घ्यावी शाळा
कोरोनाची लाट ओसरून शाळा सुरू होतील. शाळा सुरू झाल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल, अशा अशा पालकांना आहे. परंतु, शाळा सुरू हाेणे शक्य नसल्याने मुलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता पालकांनीच मुलांचा नियमित अभ्यास घेणे गरजेचे आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांचे हे वर्षही घरी जाईल. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच घरीच तयारी करून घ्यावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
......
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या
पहिली- ६८ हजार ७१६
दुसरी- ७४ हजार ८९६
तिसरी- ७८ हजार ४५१
चौथी- ८० हजार ४४९
..........
शाळेत मुलांना शिक्षकांचा धाक असतो. त्यामुळे मुले घरी अभ्यास करतात. परंतु, घरी ऑनलाईनमुळे त्यांना धाक राहत नाही. चार दोन शब्द लिहिल्याने त्यांचा अभ्यास पूर्ण होत नाही. दुसरीच्या मुलींला साधी अक्षर ओळखही नाही. यामुळे मुलांचा पाया कच्चा राहण्याची भीती आहे.
- संदीप मुसळे, पालक पिपरी शहाली. ता. नेवासा
......
ऑनलाईनमुळे मुले अभ्यास करत नाहीत. छोट्या मुलांना गुरुजी काय शिकवितात, ते समजत नाही. त्यामुळे ते अभ्यास करत नाहीत. मुलांचा पाया कच्चा राहिल्याने पुढे अडचणी येतील.
- अत्माराम घुणे, पालक. सुलतानपूर, ता. शेवगाव