अडीच कोटींचा चिल्लर घोटाळा अन् पोलिसांचा चिल्लर तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:25+5:302021-03-10T04:21:25+5:30
याप्रकरणी बँकेचे मुख्य शाखाधिकारी मारुती रंगनाथ औटी यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बँकेचे तत्कालीन अध्यक्ष तथा माजी ...

अडीच कोटींचा चिल्लर घोटाळा अन् पोलिसांचा चिल्लर तपास
याप्रकरणी बँकेचे मुख्य शाखाधिकारी मारुती रंगनाथ औटी यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बँकेचे तत्कालीन अध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी, बँकेचा तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ, आशुतोष सतीश लांडगे व इतर संचालकांविरोधात गुन्हा दाखल आहे. २०१७ मध्ये हा अपहार झाला होता. याप्रकरणी बँकेचे सभासद राजेंद्र गांधी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून हा अपहार उघडकीस आणला होता. या गुन्ह्यातील लांडगे याला सोमवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत २२ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणात लांडगे याचा सहभाग निष्पन्न झाला आहे. याप्रकरणी २५ जानेवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल आहे, तर नगरचा गुन्हा हा २२ डिसेंबर रोजीच दाखल झाला होता. लांडगे याच्यासह गुन्ह्यातील इतर आरोपी खुलेआम सर्वत्र फिरत आहेत तरीही त्यांना अटक झाली नाही. विशेष म्हणजे लांडगे याच्यासह इतर आरोपींनी कसा अपहार केला याचा सर्व तपशील फिर्यादीत नमूद आहे. तरीही आरोपींवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
.................................
असा केला घोटाळा
गुन्ह्यातील आरोपी आशुतोष लांडगे हा अर्बन बँकेचा कर्जदार आहे. त्याचे बँकेत मे. टेरासॉफ्ट टेक्नाॅलॉजी नावाने खाते आहे. या खात्यावर बँकेच्या मार्केटयार्ड शाखेत ऑक्टोबर २०१७ मध्ये तब्बल अडीच कोटी रुपये चिल्लर (नाणी) स्वरूपात भरणा केल्याचे दर्शविण्यात आले. प्रत्यक्षात बँकेत हा भरणा झालाच नाही. केवळ अभासी भरणा दर्शविण्यात आला. त्यानंतर बँकेतून पुन्हा लांडगे याच्या संस्थेला कर्ज देण्यात आले. दिलीप गांधी, घनश्याम बल्लाळ व आशुतोष लांडगे यांच्यासह इतर संचालकांनी एकूण तीन कोटी रुपयांची बँकेची फसवणूक केल्याचे तपासणी अहवालात समोर आल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपाधीक्षक प्रांजल सोनवणे या शाखेच्या प्रमुख आहेत.
------------------------------------------------------------
अर्बन बँकेची एकूण तीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर येऊन गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील दोषींना तत्काळ अटक होऊन त्यांच्यावर पुढील कारवाई होणे गरजेचे आहे. आरोपी मोकाट असल्याने ते गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करू शकतात. अपहार कसा झाला याचा सर्व तपशील पोलिसांकडे आहे. तरीही आरोपींवर कारवाई होत नाही.
- राजेंद्र गांधी, बँकेचे सभासद व तक्रारदार