Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षांची चिमुकली मृत्युमुखी, अहिल्यानगर-मनमाड महामार्ग रोखला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:19 IST2025-11-07T12:18:20+5:302025-11-07T12:19:58+5:30
Leopard Attack in Ahilyanagar: बिबट मारून टाका, मगच आम्ही इथून हलणार- ग्रामस्थांची मागणी

Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षांची चिमुकली मृत्युमुखी, अहिल्यानगर-मनमाड महामार्ग रोखला
लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव (जि. अहिल्यानगर): ऊसतोडणी मजुराच्या तीन वर्षीय चिमुरडीला बिबट्याने ठार केले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अहिल्यानगर-मनमाड मार्ग दोन तास रोखला. नंदिनी प्रेमदास चव्हाण (वय ३, रा. तळेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील टाकळी शिवारात नांदगावहून ऊसतोडणी मजूर आले आहेत. मृत मुलीचे वडील प्रेमदास चव्हाण हे कुटुंबासह देवीदास अशोक कोपरे यांच्या जुन्या घरामध्ये राहतात. बुधवारी सायंकाळी नंदिनी घराबाहेर खेळत असताना बिबट्याने कुटुंबीयांसमोरच तिला ओढत मक्याच्या शेतात नेले.
बिबट मारून टाका, मगच आम्ही इथून हलणार...
नागरिकांनी मृतदेह घेऊन अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील टाकळी फाटा (ता. कोपरगाव) येथे ठाण मांडले व ‘रास्ता रोको’ केला. वनविभाग बिबट्याला ठार मारत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी गावातील तरुणांनाच बिबट्याच्या शोधासाठी मक्याच्या पिकात पाठविले. बॅटऱ्या घेऊन १७ एकर मका पिकाचा परिसर तरुणांनी पिंजून काढला; पण बिबट्या सापडला नाही. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत.
बिबट्याची महिलेवर झडप
अवसरी (जि. पुणे) : गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने झडप घातल्याने महिला जखमी झाली. ही घटना पारगाव (ता. आंबेगाव) चिचगाई वस्ती येथे नुकतीच घडली. अश्विनी शिवाजी ढोबळे (२९) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. अंगावरील स्वेटर फाटला मात्र त्या बचावल्या.