चिलापीने गिळले इतर प्रजातींचे मासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:29+5:302021-09-09T04:26:29+5:30

श्रीरामपूर : जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा, मुळा, सीना, ढोरा या नद्यांमध्ये आता केवळ चिलापी याच प्रजातीचा मासा व तोही मोठ्या ...

Chilapi swallowed fish of other species | चिलापीने गिळले इतर प्रजातींचे मासे

चिलापीने गिळले इतर प्रजातींचे मासे

श्रीरामपूर : जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा, मुळा, सीना, ढोरा या नद्यांमध्ये आता केवळ चिलापी याच प्रजातीचा मासा व तोही मोठ्या संख्येने मिळून येत आहे. प्रदूषित पाण्यातही चिलापी तग धरून राहतो व गुणाकारात वाढतो. इतर माशांना मात्र तो जगू देत नाही. त्यामुळे खवय्यांना खुणावणारे गावरान वाम, कटला, रावस, मरळ, खवली हे मासे जलाशयांतून हद्दपार झाले आहेत.

या वर्षी उशिराने का होईना सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मासेमारीला चांगले दिवस आले आहेत. जिल्ह्यातून दररोज ३० टन माशांची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, मालेगाव तसेच भिवंडी, दादर येथून माशांना मागणी आहे.

मिळून येणाऱ्या माशांमध्ये चिलापीचा समावेश आहे. इतर सर्वच मासे आता नामशेष झाल्यात जमा आहेत. जाळे टाकले की त्यात केवळ चिलापी अडकणार हे ठरलेले. इतर प्रजातीचे केवळ चार-दोन मासेच मिळून येतात. ३० टनांमध्ये अवघे ५ ते १० टक्के इतर मासे आढळून येत आहेत. पूर्वी चिलापी हा केवळ उजनी धरणापुरताच मर्यादित होता. इंदापूर, भिगवण हे चिलापीचे मुख्य बाजारकेंद्र. आता मात्र त्याने जिल्ह्यातील सीना ते गोदावरी या सर्वच नद्यांचा ताबा घेतला आहे. डुक्करमासा या नावानेच त्याची वेगळी ओळख आहे. खाऱ्या, गोड्या किंवा अतिशय प्रदूषित पाण्यातही तो टिकून राहतो. त्यामुळेच डुक्करमासा हे नाव त्याला चिकटले.

एखाद्या नदीत अथवा जलाशयांत तो घुसला की तेथे स्वत:चे प्रस्थ वाढवितो. पाण्यातील शेवाळ तर खातोच, मात्र वेळप्रसंगी इतर माशांची अंडीही फस्त करतो. चिलापीची उत्पादनक्षमता अफाट आहे. त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे इतर माशांवर मात्र संक्रांत आली आहे. ते नामशेष होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.

--------

गरिबांचा मेवा

चिलापीला गरिबांचा मेवा म्हटले जाते. कारण अवघ्या ४० ते ५० रुपये किलो दरामध्ये तो उपलब्ध होतो. ६०० ते ८०० रुपये किलोच्या सुरमई व पापलेटपेक्षा चिलापीवरच ताव मारलेला बरा, असे खवय्ये म्हणतात. अगदी मुंबईतील गरीब व मध्यमवर्गीय घटकांना तो परडवतो.

------------

मासेमारीत अनेकांना रोजगार

चिलापीचे पीक जोमाने बहरले आहे. त्यामुळे नद्या व जलाशयांमध्ये हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. चारशे रुपयांचे दहा किलो मासे हातोहात ८०० रुपयांना व्यापाऱ्यांना विकून मोकळे होता येते व रोजंदारी सुटते.

---------

चिलापीचे आक्रमण थोपविणे गरजेचे आहे. स्थानिक माशांच्या जाती जतन कराव्या लागतील. त्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा फार उशीर होईल.

-इम्रान शेख, मासे व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते.

श्रीरामपूूर.

----

Web Title: Chilapi swallowed fish of other species

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.