सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 06:39 IST2025-04-28T06:37:00+5:302025-04-28T06:39:41+5:30
हे केमिकल कोणते होते आणि ते शरीरासाठी किती घातक आहे हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. पथकाने २५ एप्रिल रोजी मे. खुशी इंडस्ट्रीच्या गोडाऊनवर छापा टाकला.

सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
अहिल्यानगर : येथील अन्न, औषध प्रशासनाच्या पथकाने नागापूर एमआयडीसी येथील एका गोडाऊनवर छापा टाकून ६२ लाख रुपये किमतीचा बनावट बासमती तांदूळ जप्त केला आहे. जप्त केलेला तांदूळ व त्यासाठी वापरलेल्या केमिकलचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
हे केमिकल कोणते होते आणि ते शरीरासाठी किती घातक आहे हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. पथकाने २५ एप्रिल रोजी मे. खुशी इंडस्ट्रीच्या गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी तेथे साध्या तांदळाला केमिकल पावडर लावून सुगंध निर्माण केला जात होता. हा तांदूळ खुशी गोल्ड नावाच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग केला जात हाेता.
अन्न, औषध प्रशासनाच्या पथकाने अन्न, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी येथील खुशी इंडस्ट्रीच्या गोडाऊनमध्ये छापा टाकला.
‘ते’ केमिकल कोणते?
बासमती तांदळाला नैसर्गिक सुगंध असतो. या सुगंधावरून ग्राहक बासमती तांदूळ ओळखतात. साध्या तांदळाला असाच सुगंध येण्यासाठी एमआयडीसी येथील गोडाऊनमध्ये तांदळाला केमिकल लावले जात होते. हे केमिकल कोणते होते आणि ते शरीरासाठी किती घातक आहे हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल.
ताब्यात घेतलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले
असून तेथील अहवाल आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी सांगितले.