परप्रांतीय चोरट्यांना पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:16+5:302021-03-21T04:20:16+5:30
अहमदनगर : गर्दीत प्रवेश करून हातचलाखीने मोबाईल चोरणारे तसेच चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघा परप्रांतीय चोरट्यांना भिंगार ...

परप्रांतीय चोरट्यांना पाठलाग करून पकडले
अहमदनगर : गर्दीत प्रवेश करून हातचलाखीने मोबाईल चोरणारे तसेच चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघा परप्रांतीय चोरट्यांना भिंगार पोलिसांनी शनिवारी पाठलाग करून पकडले.
रायप्पा मधुर (२६, रा. चिकमंगलूर कर्नाटक) व रमेश प्रसाद गोडेटी (२३, रा. नुल्ल्लर आंध्रप्रदेश) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. चोरट्यांकडून चोरीचे ५५ हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. नागरदेवळे येथील सत्तार पीर मोहम्मद हे भिंगार येथे बाजार करण्यासाठी गेले तेव्हा त्यांचा मोबाईल चोरीला गेला होता. याबाबत त्यांनी पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन पाठलाग करीत त्यांना अटक केली. अटक केलेल्या दोघा आरोपींची पोलीस कसून चौकशी करीत असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी, हेड कॉन्स्टेबल जी. डी गोल्हार, पोलीस नाईक राहुल द्वारके, भानुदास खेडकर, राजू सुद्रिक, समीर शेख, एस. बी. तावरे, अमोल आव्हाड अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.