महिलांचा आरोपींवर चपलांचा प्रहार
By Admin | Updated: July 26, 2016 00:04 IST2016-07-26T00:02:10+5:302016-07-26T00:04:07+5:30
अहमदनगर :अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांच्यावर सोमवारी नगरच्या जिल्हा न्यायालयात संतप्त महिलांनी हल्ला करत त्यांना चपलांचा चोप दिला़

महिलांचा आरोपींवर चपलांचा प्रहार
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांच्यावर सोमवारी नगरच्या जिल्हा न्यायालयात संतप्त महिलांनी हल्ला करत त्यांना चपलांचा चोप दिला़ या घटनेत सहायक फौजदार कल्पना केदारी या जखमी झाल्या आहेत़ घटनेनंतर पोलिसांनी पाच महिलांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
भवाळ व भैलुमे यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी सकाळी ११ वाजता त्यांना जिल्हा न्यायालयात आणले होते़ यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ न्यायालयीन सुनावणीनंतर आरोपींना न्यायालयाबाहेर नेत असताना उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या माजी पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांसह पाच ते सहा महिलांनी आरोपींच्या दिशेने चप्पल भिरकावत त्यांच्यावर झेप घेतली़ यावेळी त्यांना मारहाण करत वाहनाबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला़ अचानक घडलेल्या या प्रकरणाने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली़ यावेळी पोलीस आणि महिलांमध्ये चांगलीच झटापट झाली़
बंदोबस्तात असलेल्या सहायक फौजदार कल्पना केदारी यांना मार लागल्याने त्या जखमी झाल्या.पोलिसांनी प्रसंगावधान राखत आरोपींना महिलांच्या हल्ल्यातून सोडवत वाहनात बसविले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते़ यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती़ आरोपींना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या माजी पदाधिकारी स्मिता सूर्यकांत अष्टेकर यांच्यासह मीना मनोहर कोटे, अश्विनी सुरेश गायकवाड, रागिणी गणेश फरारे, कुसुम अर्जुन जमधाडे यांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़
(प्रतिनिधी)
\आरोपींच्या कोठडीत वाढ
कोपर्डी घटनेत पोलिसांनी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिघांना ताब्यात घेतले असून, यातील पहिला आरोपी शिंदे हा सध्या पोलीस कोठडीत आहे़ भवाळ व भैलुमे यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़ सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील अॅड़ सतीश पाटील यांनी आरोपींची चौकशी अजून पूर्ण झाली नसून, क्रॉस व्हेरिफिकेशन व स्पॉट व्हिजिट अजून बाकी आहे़ घटनेविषयी पोलिसांना परिपूर्ण माहिती घ्यावयाची असल्याने आरोपींना सात दिवसांची कोठडी मिळावी, असा युक्तिवाद केला़ यावेळी न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत ३० जुलैपर्यंत वाढ केली़