सभापतीपदाच्या आरक्षणात बदल
By Admin | Updated: August 21, 2014 22:57 IST2014-08-21T22:39:15+5:302014-08-21T22:57:07+5:30
अहमदनगर : पाथर्डी पंचायत समिती सभापती पदासाठीच्या आरक्षणात नव्याने बदल करण्यात आला

सभापतीपदाच्या आरक्षणात बदल
अहमदनगर : पाथर्डी पंचायत समिती सभापती पदासाठीच्या आरक्षणात नव्याने बदल करण्यात आला असून, सभापती पद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे़ त्यामुळे पाथर्डी पंचायत समितीच्या अगामी सभापती महिला असणार आहेत़
जिल्हा परिषद पंचायत समिती सभापतींचा कार्यकाल येत्या १३ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे़ कार्यकाल संपत आल्याने सभापती पदासाठी निवडणूक घेण्याच्या जोरदार हलचाली सुरू झाल्या आहेत़ आगामी सभापती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे़ पंचायत समिती सभापती पदासाठीचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे़ सोडतीव्दारे सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे़ पाथर्डी पंचायत समिती सभापती पदासाठीही सोडत काढण्यात आली होती़ त्यामध्ये पाथर्डी पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव झाले होते़ मात्र या प्रवर्गातील एकही सदस्य पंचायत समितीत नसल्याने आरक्षणात बदल करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ पंचायत समिती सदस्यांनी ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली़ त्यानुसार जिल्हा ग्रामपंचायत विभागाने आरक्षणात बदल करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केला होता़ या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून, पाथर्डी पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्याचे नव्याने जाहीर करण्यात आले आहे़
पाथर्डी पंचायत समितीचे पुढील सभापती महिला सदस्यांतून निवडले जाणार आहे़ पंचायत समितीती पुरुष सदस्यांची संधी यामुळे हुकली आहे़ पंचायत समितीवर महिलाराज येणार आहे़ मात्र सभापती निवडीवर आचारसंहितेचे सावट आहे़ आचारसंहिता शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे सभापती पदाची निवड लांबणीवर पडेल, असे बोलले जात आहे़ त्यामुळे सध्याच्या सभापतींना काही दिवसांची मुदत मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे़
(प्रतिनिधी)