निंबळक : नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती स्त्री-वर्गासाठी निघाले. मात्र या वर्गाचा उमेदवार नसल्यामुळे हे आरक्षणात बदल करावा, अशा मागणीचे निवेदन धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे.
धनगरवाडी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. २८ जानेवारीला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात अनुसुचित जमाती स्त्री वर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण पडले. या पदासाठी एकही जागा नसल्याने त्या प्रवर्गातील उमेदवारच नाही. सरपंचपदाचे आरक्षण पडलेल्या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने सरपंचपद पाच वर्ष रिक्त राहणार आहे. मागील निवडणुकीतही याच प्रवर्गतील जागा उमेदवाराअभावी रिक्त होती. सरपंचपद रिक्त राहिल्यास गावच्या विकासात अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सरपंचपदाच्या आरक्षणात नियमामुसार बदल करावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संदीप शिकारे, प्रविण शिकारे, सचिन शिकारे, निलेश शिकारे, अर्जुन शिकारे, सुनील शिकारे, विशाल शिकारे, अशोक शिकारे आदींच्या सह्या आहेत.