अध्यक्षांसह सभापतींना मुदतवाढीची शक्यता
By Admin | Updated: August 19, 2014 23:31 IST2014-08-19T23:19:03+5:302014-08-19T23:31:48+5:30
अहमदनगर: जिल्हा परिषद अध्यक्षांसह पंचायत समिती सभापतींना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे़

अध्यक्षांसह सभापतींना मुदतवाढीची शक्यता
अहमदनगर: जिल्हा परिषद अध्यक्षांसह पंचायत समिती सभापतींना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे़ जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत पुढील महिन्यात संपुष्टात येत असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू महिन्यातच लागू होईल, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे़ आचारसंहिता काळातच पदाधिकाऱ्यांची मुदत संपणार असल्याने ही निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत़
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात येत आहे़ त्यांच्या निवडीला २० सप्टेंबर रोजी अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. अध्यक्षांची निवड अडीच वर्षांसाठी असते़ कार्यकाल संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ सप्टेंबर रोजी नवीन अध्यक्षांची निवड करावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले असून, त्यानुसार ग्रामपंचायत विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे़ जिल्हा परिषदेचे पुढील अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे़ अध्यक्षपदासाठीचे आरक्षण पूर्वीच जाहीर झाले आहे़ नव्याने जाहीर झालेल्या आरक्षणानुसार नवीन अध्यक्ष निवडीसाठीची सभा घेण्यात येईल़ पंचायत समिती सभापतींचाही कार्यकाल येत्या १३ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे़ सभापती निवडीसाठी १४ सप्टेंबर रोजी पंचायत समितीची सभा घेण्याच्या सूचनादेखील प्राप्त झाल्या आहेत़ याविषयीही कार्यवाही सुरू झाली आहे़ असे असले तरी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागू होण्याची दाट शक्यता आहे़ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडी होऊ शकणार नाहीत़ या निवडीवर आचारसंहितेचे सावट असणार आहे़ आचारसंहितेत ही निवडणूक होणार नसल्याने सध्याच्या पदाधिकाऱ्यांनाच मुदतवाढ मिळेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे़ विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळेल़ परंतु आचारसंहिता असल्याने नवीन कामे करणे त्यांना शक्य होणार नाही़ विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असून, आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला विधानसभेची किनार असणार आहे़ अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने अनेकांची अडचण होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
पंचायत समिती सभापती
कार्यकाल- १३ सप्टेंबरपर्यंत़
निवडीची तारीख- १४ सप्टेंबर रोजी
अध्यक्षपद महिलांसाठी राखीव
नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी अध्यक्षपद राखीव आहे़ या प्रवर्गातील महिला सदस्यांतूनच पुढील अध्यक्ष निवडला जाणार आहे़
जिल्हा परिषद अध्यक्ष
अध्यक्षांचा कार्यकाल- दि़ २० सप्टेंबरपर्यंत
निवडीची तारीख- दि़ २१ सप्टेंबर रोजी