तंटामुक्ती अध्यक्षावर चाकूहल्ला
By Admin | Updated: August 17, 2014 23:11 IST2014-08-17T23:09:03+5:302014-08-17T23:11:42+5:30
राहुरी : पाणलोटक्षेत्र समितीची झालेली निवड अमान्य असल्याचा आरोप करत कानडगाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षावर ग्रामसभेतच चाकूहल्ला केल्याची केल्याची घटना घडली.

तंटामुक्ती अध्यक्षावर चाकूहल्ला
राहुरी : पाणलोटक्षेत्र समितीची झालेली निवड अमान्य असल्याचा आरोप करत कानडगाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षावर ग्रामसभेतच चाकूहल्ला केल्याची केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कानडगावसाठी पाच वर्षात पाणलोट क्षेत्रासाठी ३३ कोटी रूपये उपलब्ध होणार आहेत़ यासंदर्भात १ मे रोजी समिती निवडण्यात आली़ परंतु यातील सदस्यांना विरोधकांचा विरोध आहे. त्याचाच परिपाक स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभेत दिसून आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मण गागरे यांची निवड करण्याचा सूर होता. परंतु विरोधकांनी त्यास आक्षेप घेतला. बिगर अध्यक्षाची सभा घ्या, असा आग्रह मधुकर लोंढे यांनी धरला़ त्यावर अध्यक्ष निवड झाल्यानंतरच सभेचे कामकाज सुरू करावे, असे मत तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जगन्नाथ लोंढे यांनी मांडले़ सोपान हिरगळ, बाबा गागरे, सीताराम गागरे,जावेद सय्यद, सोपान गागरे यांनी निवडीला विरोध दर्शविला़
गोंधळ होत असल्याचे पाहून तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लोंढे यांनी शांततेचे आवाहन केले. परंतु विरोधकांनी त्यांची गचांडी धरून कपडे फाडले, त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला़ गर्दीचा फायदा उठवत एकाने लोंढे यांच्यावर चाकूचा वार केल्याने कमरेखाली जखम झाली़ लोंढे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना उपस्थितांनी मारहाण केली़ ग्रामसेविका पक्षपाती कारभार करीत असल्याचा आरोप करीत काहींनी असभ्य शब्दांचा मारा केला़ गोंधळात ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. विस्तार अधिकारी यू़ आऱ मुळे यांचा हातही मुरगाळला़ अर्ध्या तासाने पोलीस घटनास्थळी आले. पोलीस उपनिरीक्षक गोगावणे, कोरडे, भांड यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले़ पुन्हा सभा घेण्यासंदर्भात चर्चा झाली़ मात्र तणावामुळे सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला़
ग्रामसेविका स्नेहल भागवत यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये मधुकर लोंढे, सोपान हिरगळ, जावेद सय्यद, बाबासाहेब गागरे, उपसरपंच लक्ष्मण संसारे यांच्याविरूध्द फिर्याद दाखल केली़ ग्रामसभा सुरू असताना सरकारी कामात हस्तक्षेप केला़ ग्रामसभा घ्यायची नाही म्हणून धमकी देऊन प्रोसेडींग फाडून टाकले व कार्यालयाला कुलूप ठोकले असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
(तालुका प्रतिनिधी)
तर राजीनामा देईल
विरोधकांना सत्तेची हाव असल्याने चांगल्या कामात अडथळा आणला़ गावकऱ्यांना शांतता हवी आहे़ मात्र मूठभर पुढारी स्वार्थासाठी त्रास देत आहेत़ चांगले काम आवडत नसेल तर मी राजीनामा देणे पसंत करील़
- लक्ष्मण गागरे, सरपंच
महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात चांगले काम केले म्हणून बक्षीस मिळाले़ लोकशाही मार्गाने ग्रामसभा व्हावी म्हणून प्रयत्न केले़ गचांडी धरून व कपडे फाडून विघ्नसंतोषी थांबले नाही तर माझ्यावर चाकू हल्ला करण्यापर्यंत मजल गेली़
- जगन्नाथ लोंढे, तंटामुक्ती अध्यक्ष
ग्रामसेविका चुकीचे प्रोसेडिंग लिहितात़ त्यांनी घरी लिहिलेले प्रोसेडिंग सभेत आणले. पाणलोटक्षेत्र निधीसाठी नेमलेली समितीच आम्हाला अमान्य आहे़ ग्रामसभेचे व्हीडीओ चित्रीकरण आम्ही केले आहे. त्यातून काय ते बाहेर येईल. आम्ही नव्हे, तर गावकऱ्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले.
- सोपान हिरगळ, विरोधक