साखळी उपोषणकर्त्यांकडून काळे कपडे परिधान करुन सरकारचा निषेध
By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 26, 2023 16:14 IST2023-10-26T16:13:25+5:302023-10-26T16:14:07+5:30
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन व मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे

साखळी उपोषणकर्त्यांकडून काळे कपडे परिधान करुन सरकारचा निषेध
कोपरगाव (जि. अहमदनगर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी कोपरगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. गुरूवारी दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून निषेध नोंदविला. दरम्यान आ. आशुतोष काळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषणाला पाठींबा दर्शविला आहे.कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव व करंजी या गावांत राजकिय पक्षाच्या नेत्यांना गाव बंदी करण्यात आलेली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन व मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी कोपरगावात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण बुधवारी सुरू करण्यात आले. गुरूवारी अनिल गायकवाड, बाळासाहेब जाधव, ॲड. योगेश खालकर, विनय भगत, बाळासाहेब देवकर, सुनिल साळूंके या उपोषणकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून राज्य व केंद्र शासनाचा निषेध केला.
दरम्यान आ. आशुतोष काळे यांनी गुरूवारी सकाळी उपोषणस्थळास भेट दिली व आपला पाठींबा दर्शविला. याच प्रमाणे शिख समाजातर्फे कलवींदरसिंह दडीयाल, मुस्लिम समाजाच्या वतीने महेमुद सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संतोष गंगवाल यांनी तर शेतकरी कृती समितीच्या वतीने तुषार विध्वंस यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठींबा दर्शविला आहे.