पेट्रोल मिश्रणाकरीता केंद्र सरकार करणार साखर कारखान्यांचे इथेनॉल खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 11:55 IST2020-10-07T11:54:48+5:302020-10-07T11:55:17+5:30
श्रीरामपूर : केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये मिश्रणाकरिता साखर कारखान्यांकडील इथेनॉलचे संपूर्ण उत्पादन दोन ते अडीच रुपये लिटर वाढीव दराने खरेदी करण्याची यंदा तयारी दाखवली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील साखर उद्योगाला संजीवनी मिळणार आहे. गोदामामध्ये साखर पडून राहिल्याने कारखानदार अडचणीत सापडले होते.

पेट्रोल मिश्रणाकरीता केंद्र सरकार करणार साखर कारखान्यांचे इथेनॉल खरेदी
शिवाजी पवार
श्रीरामपूर : केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये मिश्रणाकरिता साखर कारखान्यांकडील इथेनॉलचे संपूर्ण उत्पादन दोन ते अडीच रुपये लिटर वाढीव दराने खरेदी करण्याची यंदा तयारी दाखवली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील साखर उद्योगाला संजीवनी मिळणार आहे. गोदामामध्ये साखर पडून राहिल्याने कारखानदार अडचणीत सापडले होते.
सरकारने २०१८ साली राष्ट्रीय जैैव इंधनाचे धोरण आखले होते. त्यानुसार पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २०२२ पर्यंत १० टक्के तर २०३० पर्यंत २० टक्क्यांनी वाढविण्याचे निश्चित केले गेले. त्यामुळे साखर कारखान्यांच्या प्रत्येक हंगामामध्ये इथेनॉलच्या खरेदी दराबाबत सकारात्मक धोरण राबविले जात आहे.
पूर्वी सरकार प्रत्येक कारखान्यांना इथेनॉल उत्पादनाची मर्यादा ठरवून देत होते. मात्र साखरेच्या बंपर उत्पादनामुळे सुरू होणाºया हंगामामध्ये इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. जिल्ह्यात १५ आॅक्टोबरपासून कारखान्यांचे धुराडे पेटणार आहेत. बाहेरील जिल्ह्यातून येणारा ऊस विचारात घेता कारखान्यांकडून जिल्ह्यात ११० लाख मेट्रिक टन गाळपाचा अंदाज आहे. त्यामुळे सर्वच कारखान्यांनी इथेनॉलमध्ये दीड पटीने अधिक निर्मितीचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील अशोक, ज्ञानेश्वर, संजीवनी, प्रवरा, गंगामाई, अंबालिका, संगमनेर, अगस्ती, श्रीगोंदा हे कारखाने इथेनॉल निर्माण करतात. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सुमारे ४० कोटी लिटर इथेनॉल तयार होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांनी प्रत्येक कारखान्याला क्षमतेच्या दीड पट उत्पादनाला परवानगी दिली आहे. त्याकरिता परवान्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.