भक्तिमय वातावरणात महावीर जयंती साजरी

By Admin | Updated: April 20, 2016 00:09 IST2016-04-20T00:05:47+5:302016-04-20T00:09:49+5:30

अहमदनगर : नगर शहरात भक्तिमय वातावरणात भगवान महावीर यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली़

Celebrating Mahavir Jayanti in a devotional environment | भक्तिमय वातावरणात महावीर जयंती साजरी

भक्तिमय वातावरणात महावीर जयंती साजरी

अहमदनगर : नगर शहरात भक्तिमय वातावरणात भगवान महावीर यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली़ कापड बाजारातील जैन मंदिरापासून महावीरांच्या नावाचा जयघोष करत निघालेल्या मिरवणुकीत सुशोभित रथ, उंट, घोडे, हत्ती आणि पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ घोड्यावरील स्वार बालक मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले़
प़ पू़ आचार्य हर्षवल्लभ सुरीश्वरजी महाराज, प़ पू़ पंन्यास दर्शनवल्लभ विजयजी महाराज यांच्यासह कापडबाजारातील जैन मंदिरापासून मिरवणुकीला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला़ मिरवणुकीत पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ लाल व लिंबू रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला भाविकांची संख्या मोठी होती़ ही मिरवणूक अर्बन बँक चौक, घुमरेगल्ली, महाजन गल्लीसमोरील दिगंबर जैन मंदिर, गुजर गल्लीतील आदेश्वर भगवान जैन मंदिर, लक्ष्मी कारंजा, जुनी छाया टॉकीज, चितळे रस्ता, नेता सुभाष चौक, नवीपेठ जैन स्थानक, घासगल्ली, महात्मा गांधी चौक, तेलीखुंट चौक, दाळमंडई, आडतेबाजार, सराफबाजार, जुना कापडबाजार, ख्रिस्त गल्ली कारंजा, संगम चौक, मार्केट यार्ड, सहकार सभागृहामार्गे मिरवणूक धार्मिक बोर्डवर दाखल झाली़ मिरवणुकीचे रुपांतर सभेत झाले़
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भाविकांचे स्वागत करण्यात येत होते़ पिण्याच्या पाण्याचे व खाद्यपदार्थांचे वाटप यावेळी करण्यात आले़ मिरवणूक मार्गावर भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित रांगोळ्यांचे परिक्षण सौ़ शैला गांधी व सरोज कटारिया यांनी केले़ नवीपेठ कोपरा येथे आनंदराम मुनोत, ख्रिस्त गल्ली येथे मीनाताई मुनोत, मार्केट यार्ड चौकात वसंत लोढा यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आले़ ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या़ सभेत प़ पू़ प्रखर वक्ते आदर्शऋषी म़ सा़ यांनी स्वागत केले़ गुरुवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली़ प़ पू़ अलोकऋषिजी यांनी भगवान महावीरांच्या जीवनाबाबत माहिती दिली़ जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा व श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले़ आभार उपाध्यक्ष संतोष बोथरा यांनी मानले़
(प्रतिनिधी)
भगवान महावीर यांचे विचार जगातील अराजकता घालविण्यास उपयुक्त ठरतील़ त्यांच्या संदेशातून जगात शांती नांदेल़
- प़ पू़ पंन्यास दर्शनवल्लभ विजयजी म़ सा़

Web Title: Celebrating Mahavir Jayanti in a devotional environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.