झाडावर मांजर, अफवा मात्र बिबट्याच्या पिल्लांची
By | Updated: December 6, 2020 04:22 IST2020-12-06T04:22:11+5:302020-12-06T04:22:11+5:30
अहमदनगर : नगरपासून जवळच नगर-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या जांब या गावाच्या परिसरातील शेतातील झाडावर सकाळी बिबट्याचे पिल्लू बसले असल्याचे ...

झाडावर मांजर, अफवा मात्र बिबट्याच्या पिल्लांची
अहमदनगर : नगरपासून जवळच नगर-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या जांब या गावाच्या परिसरातील शेतातील झाडावर सकाळी बिबट्याचे पिल्लू बसले असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने त्यास पाहण्यास या भागात मोठी गर्दी झाली. मात्र, ते बिबट्याचे नसून मांजर असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला.
झाडावर बसलेले बिबट्याचे पिल्लू असून त्या पिल्ल्ाची आई जवळच असेल या भीतीने कोणीही त्या झाडाजवळ जाण्याची हिंमत करीत नव्हते. उपसरपंच प्रवीण पवार व सामाजिक कार्यकर्ते संतोष कर्पे यांनाही लांबून झाडावर बसलेले पिल्लू दिसले. याबाबत त्यांनी वनविभागास माहिती दिली. काही वेळातच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, निसर्गमित्र मंदार साबळे, वनरक्षक कनिफ साबळे, तय्यब शेख, चालक अक्षय ससे आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता झाडावर रानमांजर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मांजरीने उडी मारत शेतात धूम ठोकली. बिबट्या हा मांजर कुळातला असल्याने रंगसंगतीमुळे पाहणाऱ्यांना रानमांजर व बिबट्या यातील फरक लक्षात न आल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. ते बिबट्याचे पिल्लू असल्याचे वाटले असावे, असे साबळे यांनी सांगितले. यावेळी जवळच वस्तीवर एक कुत्रे बिबट्याने मारले असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनअधिकाऱ्यांना दिली. तसेच या भागात तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली. थेटे यांनी हा भाग चांदबीबी महालाच्या जवळ असून या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याने नागरिकांनी शक्य तेवढी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.