अहमदनगर : गेल्या तीन दिवसांत आणखी तीन बड्या नेत्यांची, मंत्र्यांची प्रकरणे माझ्या हाती आली आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही पुढच्या आठवड्यात बाहेर काढणार आहे. कितीही धमक्या दिल्या तरी मी थांबणार नाही, असे आव्हानच भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिले.
भाजप नेते सोमय्या यांनी बुधवारी दुपारी पारनेर येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. या कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार कारखाना बचाव समितीने त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार सोमय्या पारनेरला आले होते. त्यांनी कारखान्याचे कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. भाजपतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सोमय्या म्हणाले, माझ्याकडे कोणी तक्रार घेऊन आले तर मी त्याची माहिती घेतो. अभ्यास करतो. अधिक माहिती आणि पुरावे संकलित करून त्याचा पाठपुरावा करतो. सामान्य माणसाच्या बाजूने मी नेहमी उभा राहतो.
कोल्हापूरमध्ये झालेल्या कारवाईबद्दल ते म्हणाले, कोल्हापूर पोलिसांनी जी वागणूक दिली, त्याबद्दल मी मुंबईतील पोलिसांत, तक्रार निवारण प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे. मला अंबाबाईचे दर्शन घेण्यापासून रोखले जात आहे. २८ सप्टेंबरला अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. दर्शन घेण्याच्या अधिकारावर गदा आल्याने पुढील आठवड्यात दिल्लीतील राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे तक्रार करणार आहे. ठाकरे, पवार हे दोन ठेकेदार आणि त्यांचे माफिया शिष्य एकत्र झाल्याने गत १९ महिन्यांत महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. सामान्य माणूस त्यांच्याविरोधात तक्रार करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र, मी कोणाला घाबरणार नाही. कितीही धमक्या आल्या, कितीही वेळा अटक झाली, तरी माझे काम सुरूच ठेवणार आहे.
---------
मला अडचणीत आणता का?
माझ्याविरुद्ध एकूण साडेपाचशे कोटी रुपयांचे अब्रूनुकसानीचे दावे करण्यात आले आहेत. संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध फक्त सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी किंमत जास्त करून मला माझ्याच पक्षात अडचणीत आणता काय? असा सवालही सोमय्या यांनी केला. संजय राऊत यांनी तक्रार झाल्यावर ५५ लाख रुपये परत केले. त्यामुळे ५५ लाख रुपयांची चोरी, हीच संजय राऊत यांची किंमत आहे, असाही घणाघात सोमय्या यांनी केला.