गदेवाडी शिवारातील व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:23 IST2021-09-11T04:23:10+5:302021-09-11T04:23:10+5:30
शेवगाव : तालुक्यातील गदेवाडी शिवारातील लांडेवस्ती येथील विनायक किसन मडके (वय ६५) यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचा मुलगा तुळशीराम विनायक ...

गदेवाडी शिवारातील व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल
शेवगाव : तालुक्यातील गदेवाडी शिवारातील लांडेवस्ती येथील विनायक किसन मडके (वय ६५) यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचा मुलगा तुळशीराम विनायक मडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि.१०) दुपारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अपहरण, खंडणी, आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुकेश दत्तात्रेय मानकर, रुपेश दत्तात्रेय मानकर, मच्छिंद्र एकनाथ धनवडे (तिघेही रा. गदेवाडी, ता. शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
आठ दिवसांपूर्वी विनायक मडके घोड्यावरून शेतात चालले होते. त्यावेळी वरील मुकेश मानकर, रूपेश मानकर, मच्छिंद्र धनवडे यांच्या वाहनाने कट मारला होता. मडके यांनी याबाबत संबंधितांना विचारणा केली असता वाहनातून तिघांनी शिवीगाळ करत दमदाटी केली होती. दुसऱ्या दिवशी गावात गेले असता त्या तिघांनी मडके यांना पुन्हा रस्त्यात अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर पुन्हा गावात भेटल्यावरही अशीच दमबाजी केली होती. मात्र, आम्ही पोलिसांना तक्रार केली नाही. ९ सप्टेंबरला रात्री ते तिघे विनायक मडके यांच्या घरी आले. त्यांना बाहेर बोलावून त्यांना जबरदस्तीने वाहनात बसविले. वाहनात त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचा मुलगा तुळशीराम मडके याने वाहनाचा पाठलाग केला. एका हॉटेलजवळ वाहन थांबलेले दिसले. तेथे त्या तिघांनी वडिलांना मारहाण केल्याचे तुळशीरामने पाहिले. ते पाहून तुळशीराम घरी गेला. भावाला सोबत घेऊन तो पुन्हा मारहाण केलेल्या ठिकाणी गेला. तेव्हा आरोपी पळून गेले होते. वडील विनायक मडके यांचा मृतदेह तेथील बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. मुलांनी त्यांना रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. यावरून तिघांविरूद्ध आयपीसी ३६४, ३०६, ३८५, २७९, ५०४, ५०६, ३४ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी काही संघटनांकडून पोलिसांवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न केला गेला. यावेळी मडके यांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, मुलाने प्रत्यक्ष घटना पाहिल्याचे सांगून तशी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात तसेच ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली होती.
---
..अन् निवळला तणाव
शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याच्या तयारीत असताना दरम्यान उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी समयसूचकता दाखवली. ते पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह रुग्णालयात दाखल झाले. यावेळी उपस्थितांच्या भावना समजून घेत या प्रकरणी जी तक्रार असेल त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करू. आरोपी आमच्या ताब्यात आहेत. योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.