रासायनिक खते, इंधन दरवाढ रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:56+5:302021-05-18T04:21:56+5:30
शिर्डी : खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांच्या किमतीत आणि पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. ...

रासायनिक खते, इंधन दरवाढ रद्द करा
शिर्डी : खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांच्या किमतीत आणि पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, संदीप सोनवणे, नीलेश कोते आदींनी प्रांताधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, यंदाचा खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. त्यासाठी पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे; परंतु गेल्या एक वर्षापासून असलेली कोरोनाची टाळेबंदी आणि अवकाळी पर्जन्य, वादळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केल्यामुळे आधीच आर्थिक गर्तेत अडकलेला शेतकरी अजून संकटात सापडला आहे. पूर्वी ११८५ ला मिळणारी डीएपीची गोणी आता १९०० रुपयाला मिळणार आहे. १०:२६:२६ च्या ५० किलो गोणीची किंमत ११७५ होती. ती आता १७७५ ला मिळणार आहे. अशाप्रकारे सर्वच मिश्रखतांच्या किमतीत भाजपाशासित केंद्र सरकारने १५ ते १७ टक्के दरवाढ केली आहे. ही दरवाढ शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडणारी आहे.
पेट्रोल, डिझेलची दरवाढ सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेली आहे. खतांच्या आणि इंधन दरवाढीचा निषेध करून ही दरवाढ रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे दीपक गोंदकर, राकेश कोते, अमित शेळके, विशाल भडांगे, प्रकाश गोंदकर, राहुल कुलकर्णी, साई कोतकर, अजित जगताप, राहुल फुंदे, सचिन गव्हाणे आदींच्या सह्या आहेत.