प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हस्ते फोडला प्रचाराचा नारळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:51 IST2021-01-13T04:51:15+5:302021-01-13T04:51:15+5:30
शेवगाव : सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेले दोन जिवलग मित्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी परस्परांच्या विरोधात उभे राहिले. राजकारणामुळे येणारी कटुता टाळत ...

प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हस्ते फोडला प्रचाराचा नारळ
शेवगाव : सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेले दोन जिवलग मित्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी परस्परांच्या विरोधात उभे राहिले. राजकारणामुळे येणारी कटुता टाळत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होण्यासाठी प्रचारातील वैयक्तिक टीकाटिप्पणी टाळत योगायोगाने प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमात दोन्ही मित्र समोरासमोर आले. समयसूचकता दाखवत दिलीप सुपारे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र गाडगे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला.
अचानकपणे घडलेल्या प्रसंगाला उपस्थित दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार टाळ्या वाजवत दाद दिली. राजकारण हा विषय निव्वळ वैरभाव, टीकाटिपणी, खोटी आश्वासने, आर्थिक उधळपट्टी, गुंडगिरी यासाठी नसून वैचारिक परिपक्वता ठेवली, तर या पलीकडे जाऊनही राजकारण करता येते. हेच खुंटेफळ येथील घटनेने अधोरेखित केले. यावेळी शांताबाई आंबादास काळे, सर्जेराव काळे, सागर तिजोरे, बाबू खंडागळे, आदिनाथ काळे, बाळू तिजोरे, शिवाजीराव शेळके, नामदेव हुलमुखे, रामतात्या काळे, अंबादास तुपविहिरे, तबाजीराव उदागे, रामनाथ पागर, संजय गाडगे, नानासाहेब मोरे आदी उपस्थित होते.