घुलेंच्या विरोधात ‘ज्ञानेश्वर बचाओ’ची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:52+5:302021-01-08T05:04:52+5:30
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या लाेकनेते घुले पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उडी ...

घुलेंच्या विरोधात ‘ज्ञानेश्वर बचाओ’ची हाक
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या लाेकनेते घुले पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उडी घेतली आहे. तालुक्यातील घुले विरोधकांची मोट बांधत मुरकुटे यांनी ‘ज्ञानेश्वर बचाओ’ची हाक दिली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरची यंदाची सार्वत्रिक निवडणूक चांगलीच गाजण्याची चिन्हे आहेत.
तालुक्यातील गडाख व घुले कुटुंबातील संघर्ष विधानसभा निवडणुकीत संपुष्टात आला. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शंकरराव गडाख यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले गडाख व घुले एकत्र आले. हे दोन्ही प्रमुख राजकीय घराणे एकत्र आल्याने विधानसभेच्या निवडणुकीत मुरकुटे यांचा निभाव लागला नाही. त्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत होते; मात्र गडाख व घुले एकत्र आल्याने लंघे हे पुन्हा स्वगृही भाजपाच्या तंबुत दाखल झाले; परंतु ज्ञानेश्वरच्या निवडणुकीत लंघे यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे लंघे अप्रत्यक्षरीत्या पुन्हा राष्ट्रवादीत असल्याचे बोलले जाते. मुरकुटे यांनी लंघे यांच्याशी चर्चा केली; मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. ज्ञानेश्वरच्या निवडणुकीत लंघे यांनी मुरकुटे यांची साथ सोडली. त्यामुळे मुरकुटे हे घुले यांचे एकमेव विरोधक आहेत. ज्ञानेश्वरच्या संचालक पदाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. माजी आमदार मुरकुटे यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवारी नेवासा येथील तहसील कार्यालयात होणार आहे. कारखान्यांची निवडणूक लढविण्यासाठी तीन वर्षे ऊस कारखान्याला दिलेला असावा, अशी अट आहे. या अटीमुळे कुणाचे अर्ज बाद होतात, याची उत्सुकता आहे.
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत १३ हजार ३०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चालू गाळीप हंगामात ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने २ हजार ७३ रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. त्यामुळे सभासदांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याचा फायदा विरोधकांना होईल. मुरकुटे यांनी घुले बंधूविरोधात ज्ञानेश्वर बचाओ कृती समिती स्थापन केली असून, समितीच्या माध्यमातून विरोधकांना एकत्र आणण्याचा मुरकुटे यांचा प्रयत्न आहे; परंतु ऐनवेळी विरोधकांना आपलेसे करण्यात घुले बंधू यांचा हातखंडा आहे. त्यामुळे मुरकुटे यांच्या बाजूने कोण आणि किती उमेदवार राहतात, छाननीनंतर स्पष्ट होईल.
..
छाननीकडे तालुक्याचे लक्ष्य
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी बुधवारी होत आहे. कारखान्याला तीन वर्षे ऊस घातलेला असावा, ही अट विरोधकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. मुळाच्या संचालक पदासाठी दाखल केलेले अर्ज या अटीमुळेच रद्द झाले आहेत, असे मुरकुटे यांच्याकडून सांगण्यात आले. त्याचीच पुनरावृत्ती ज्ञानेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतही होते की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे या छाननीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.