चितळे रोडवर सर्वाधिक वर्दळ, वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:57+5:302021-07-21T04:15:57+5:30

-------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील चितळे रस्त्यावर सर्वाधिक वर्दळ आहे. भाजी विक्रेते रस्त्यांच्या दोन्ही बाजूने पथारी टाकून ...

The busiest on Chitale Road, how to walk in a crowd of vehicles | चितळे रोडवर सर्वाधिक वर्दळ, वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे

चितळे रोडवर सर्वाधिक वर्दळ, वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे

--------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहरातील चितळे रस्त्यावर सर्वाधिक वर्दळ आहे. भाजी विक्रेते रस्त्यांच्या दोन्ही बाजूने पथारी टाकून बसतात. त्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची गर्दी होत असल्याने या मार्गावर पायी चालणे कठीण झाले आहे. याकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील लहान मोठी अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. टपरीमार्केट मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. परंतु, मध्यवर्ती शहरातील कापडबाजार व चितळे रस्त्यावरील गर्दीकडे मात्र पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. चितळे रस्त्यावर कोरोना काळातही प्रचंड गर्दी होत आहे. भाजीविक्रेते सकाळपासूनच पथारी टाकून बसतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूने विक्रेते बसत असल्याने वाहतूकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही. त्यात भाजी खरेदीसाठी आलेल्यांना नागरिकांचीही वर्दळ असते. त्यात दुचाकी व चारचाकी वाहनांचीही या मार्गावर ये-जा सुरू असते. हा रस्ता आधीच अरुंद आहे. या मार्गावर पालिकेने फुटपाथच ठेवलेला नाही. फुटपाथ नसल्याने पादचाऱ्यांनी या मार्गावरून चालायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे

शहरातील दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा, चौपाटी कारंजा ते माळीवाडा वेस, नवीपेठ, माणिक चौक, तेलीखुंट, या मार्गावर गर्दी होते. नागरिकांना रोजच वाहतूकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास पायी चालणाऱ्यांना होतो. शहरातील फुटपाथ गायब झालेले आहेत. फुटपाथवर दुकानदारांनी पक्की बांधकामे केली असून, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

....

फुटपाथ कागदावरच

शहरात नव्याने रस्ते तयार करताना फुटपाथची तरतुद करण्यात येते. रस्त्यांच्या अंदाजपत्रकात फुटपाथची कागदोपत्री नोंद असते. प्रत्यक्षात शहरातील अंतर्गत रस्त्यांचे फुटपाथ गायब आहेत. फुटपाथवर पक्के बांधकाम, टपऱ्याच्या थाटण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पायी चालणाऱ्यांची मोठी गैरसाेय होत असून,याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

.....

अतिक्रमण हटाव मोहीम दाखवायलाच

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्यावतीने शहरात दररोज पथारीवाल्यांना हाटविले जाते. परंतु, रस्त्यांवर केलेले पक्के अतिक्रमण हटविले जात नाही. वर्षानुवर्षे ही अतिक्रमणे जैसे थे आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

....

- अतिक्रमण निर्मूलनासाठी महापालिकेने मोहीम सुरू केलेली आहे. पहिल्या टप्प्यात मोठी अतिक्रमणे हटविण्यात येणार असून, त्यानंतर फुटपाथही मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात येईल.

- के. वाय. बल्लाळ, प्रमुख अतिक्रमण निर्मूलन विभाग

...

Web Title: The busiest on Chitale Road, how to walk in a crowd of vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.