शेवगावात पंतप्रधानांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:11+5:302020-12-05T04:37:11+5:30
शेवगाव : शहरातील क्रांतीचौकात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया स्टुडंट व युथ फेडरेशनच्या वतीने शेतकरी ...

शेवगावात पंतप्रधानांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
शेवगाव : शहरातील क्रांतीचौकात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया स्टुडंट व युथ फेडरेशनच्या वतीने शेतकरी कायद्याच्या विरोधात निषेध नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचाही निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी कॉ. सुभाष लांडे म्हणाले, हे सरकार शेतकरी विरोधी असून, त्यांनी ताबडतोब पायउतार व्हावे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. अखिल भारतीय किसान सभेच्या आवाहनानुसार देशभरातील शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी दिल्लीची नाकाबंदी केली आहे. शेतकरी विरोधी तीनही कायदे मागे घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असा निर्धार देशभरातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्याशिवाय हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. देशभरामधून आलेल्या शेतकऱ्यांवर मोदी सरकार अत्याचार करीत आहे. त्याचा निषेध आम्ही यावेळी करीत आहोत, असेही लांडे यांनी सांगितले.
यावेळी संजय नांगरे, शशिकांत कुलकर्णी, बापू राशीनकर, बापूराव लांडे, कारभारी वीर, अशोक नजन, शिवाजी भुसारी, प्रेम अंधारे, विश्वास हिवाळे, शेखर तिजोरे, अजय मगर, बाबूलाल सय्यद आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
फोटो : ०३ शेवगाव आंदोलन
शेवगाव येथे भाकपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.