बांधकाम व्यावसायिकांचा सिमेंट खरेदीवर बहिष्कार
By Admin | Updated: July 15, 2014 00:47 IST2014-07-14T22:56:51+5:302014-07-15T00:47:01+5:30
अहमदनगर: सिमेंटच्या गोणीमागे जवळपास १०० रुपये दरवाढ झाली असून ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांनी सिमेंट खरेदीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्या
बांधकाम व्यावसायिकांचा सिमेंट खरेदीवर बहिष्कार
अहमदनगर: सिमेंटच्या गोणीमागे जवळपास १०० रुपये दरवाढ झाली असून ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांनी सिमेंट खरेदीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती क्रीडाईचे अध्यक्ष जवाहर मुथा यांनी दिली.
सिमेंट कंपन्यांनी कार्टेल करून ही दरवाढ केल्याचे बांधकाम संघटनेचे म्हणणे आहे. अचानक झालेल्या दरवाढीमुळे बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत. ज्या कंपन्या दरवाढ मागे घेणार नाहीत त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. केंद्र शासनाने कुठल्याही प्रकारची दरवाढ केलेली नसताना आणि पावसाळ्यात सिमेंट व्यवसायावर मंदी असतानाही कंपन्यांनी घेतलेला हा निर्णय निंदनीय असल्याचे संघटनेने म्हटले आहे. सिमेंट दरवाढीने बांधकामाचे दर प्रति चौरस फूट १०० रुपयाने वाढणार आहेत. त्यामुळे घरखरेदीचे दर वाढतील. १५ ते २८ जुलै या काळात बिल्डर्स असोसिएशन, क्रीडाई, आर्किटेक्ट आणि प्रमोटर्स बिल्डर्स संघटनेने खरेदी थांबविण्याचा निर्णय घेतला. या काळात कुणीही सिमेंट खरेदी करू नये असे आवाहन जवाहर मुथा, इकबाल सय्यद, रमेश छाजेड, अनिल मुरकुटे यांनी केले आहे. या काळात सिमेंट कंपन्यांनी दरवाढ मागे घेतली नाहीतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे मुथा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नगर शहरात दरमहा ५० हजार तर जिल्ह्यात २ लाख सिमेंट गोण्यांची विक्री होते. सिमेंट खरेदीवर बहिष्कार टाकल्याने बांधकामे अर्धवट पडण्याचा धोका आहे.