महाराष्ट्राला समृद्ध करणारा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:24 IST2021-03-09T04:24:00+5:302021-03-09T04:24:00+5:30
संगमनेर : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पातून सर्व समाजघटकांना व विभागांना न्याय दिला आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊन ...

महाराष्ट्राला समृद्ध करणारा अर्थसंकल्प
संगमनेर : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पातून सर्व समाजघटकांना व विभागांना न्याय दिला आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊन महाराष्ट्राला समृद्ध करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
अर्थसंकल्पाचे स्वागत करून थोरात म्हणाले की, अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या अर्थसंकल्पात रोजगारनिर्मिती व कल्याणकारी योजनांबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला असून यातून राज्याला गतवैभव प्राप्त होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी ७ हजार ५०० कोटी रुपये किमतीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. १५० रुग्णालयांमध्ये कर्करोग निदान सुविधा, सात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, ११ शासकीय परिचर्या विद्यालयांचे महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.
अन्नदाता बळीराजाला ३ लाख रुपयांपर्यंत बिनव्याची पीककर्ज, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांना थकीत वीजबिलात सूट, शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मिती, पक्का गोठा, शेळीपालन, कुक्कुटपालनाची शेड बांधण्यासाठी मदत दिली जाणार आहे.
सिंचन, मदत व पुनर्वसन, रेल्वे, रस्ते आणि विमानतळाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. ग्रामीण रस्ते प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक कारागीर, मजूर व कामगारांना कौशल्य विकाससाठी मदत देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबईतील विविध विकास प्रकल्प, राज्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटनाच्या विकासासाठी भरीव मदतीची तरतूदही करण्यात आलेली आहे. सर्वच महामंडळांसाठी भरीव निधीची तरतूद करून सर्वच समाजघटकांना न्याय दिला आहे, असे महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले.