नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST2021-08-01T04:20:25+5:302021-08-01T04:20:25+5:30

अहमदनगर : भल्याभल्यांना जेरीस आणणारी नोटाबंदी अन् संपूर्ण जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोना महामारीतही सरकारी कार्यालयांतील लाचखोरीचा व्हायरस चांगलाच सक्रिय ...

Bribery rampant even in denomination ban, communication ban! | नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात!

नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात!

अहमदनगर : भल्याभल्यांना जेरीस आणणारी नोटाबंदी अन् संपूर्ण जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोना महामारीतही सरकारी कार्यालयांतील लाचखोरीचा व्हायरस चांगलाच सक्रिय आहे. गेल्या साडेपाच वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात तब्बल १७५ सापळा कारवाई करत लाचखोर लोकसेवकांना जेरबंद केले आहे.

ज्या लाचखोर लोकसेवकाविरोधात तक्रार केली जाते ते लाचलुचपतच्या सापळ्यात अडकतात; मात्र असे अनेक जण आहेत जे सरकारी कामाचे पैसे घेतात, मात्र सापडत नाहीत. २०१६ मध्ये नोटबंदी झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह सर्वच उद्योग-व्यवसाय अडचणीत आले. नोटबंदीतून जनजीवन सावरत नाही तोच कोरोना महामारी ओढवली. त्यामुळे अनेकांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागता. अशाही परिस्थितीत सरकारी कार्यालयातील लाचखोरी कायम होती. २०१६ मध्ये जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांतील तब्बल ४१ जण लाच घेताना रंगेहाथ सापडले. कोरोनाकाळात २०२० मध्ये ३२ कारवायांत ३७ जण तर जुलै २०२१ पर्यंत २१ कारवायांत २८ जणांवर लाचेची कारवाई झाली आहे. यातून लॉकडाऊनकाळातही लाचखोरी जोमात असल्याचे पाहावयास मिळाले. क्लासवन अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीही लाच घेताना अडकले आहेत.

----------------------

लाचलुचपत विभागाची प्रभावी कारवाई

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधीक्षक हरिश खेडकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रभावी कारवाया झाल्या आहेत. खेडकर यांच्या पथकाने २०२० मध्ये ३८ तर मागील सात महिन्यांत २१ सापळा कारवाई करून २८ लाचखोरांना जेरबंद केले आहे. तसेच अपसंपदेचे तीन गुन्हे दाखल केले आहेत. तक्रार येताच लाचलुचपत विभागातील अधिकारी तत्काळ दखल घेऊन कारवाई करतात. त्यामुळे तक्रारदारांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आहे.

------------------

महसूल विभाग सर्वांत पुढे

महसूल विभागामध्ये नागरिकांचा सततचा संपर्क येत असतो. जमिनीचे वाद, वारसनोंदी अशा प्रकारची सततची कामे महसूल विभागात असतात. कार्यालयात कामे घेऊन येणारे हे सर्वसामान्य शेतकरी असतात. या शेतकऱ्यांचे अज्ञान हेरून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. एखादा शेतकरी चाणाक्ष निघाल्यासच तो लाचलुचपतकडे धाव घेतो. अन्यथा निमूटपणे पैसे देऊन काम मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जाते.

-------------------

लाचखोरांविरोधात तक्रारदारांनी पुढे यावे

एकेकाळी महसूल आणि पोलीस विभागातील लाचखोरीबाबत जास्त तक्रारी असायच्या. प्रत्यक्षात मात्र इतर सरकारी कार्यालयांतही लाच घेण्याचे प्रकार घडतात. मागील दोन वर्षांत वनविभाग, हिवताप कक्ष, भूमिअभिलेख कार्यालय, जातपडताळणी आदी विभागांतील अधिकारी, कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत. त्यामुळे कोणत्याही सरकारी कार्यालयात कामासाठी पैसे मागितले जात असतील तर नागरिकांनी बिनदिक्कत तक्रार द्यावी. त्याची तत्काळ दखल घेतली जाईल तसेच तक्रारदाराचे नावही गोपनीय ठेवले जाते. त्यामुळे न घाबरता लाचखोरांविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यावे.

- हरिश खेडकर, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर

-----------------------------

वर्षनिहाय लाच प्रकरणे

२०१६- ३५

२०१७- २८

२०१८- २७

२०१९- ३२

२०२०- ३२

२०२१- २१ जुलैपर्यंत

Web Title: Bribery rampant even in denomination ban, communication ban!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.