विद्यापीठासारखेच उपकेंद्राचे ब्रॅँडिंग करा

By Admin | Updated: August 23, 2014 00:44 IST2014-08-22T23:14:50+5:302014-08-23T00:44:35+5:30

अहमदनगर : नगरचे उपकेंद्र केवळ नावापुरतेच न राहाता त्याचे पुणे विद्यापीठासारखेच ब्रँडिंग करा, असे आवाहन कुलगुरू डॉ़ वासुदेव गाडे यांनी केले़

Branding sub-center like university | विद्यापीठासारखेच उपकेंद्राचे ब्रॅँडिंग करा

विद्यापीठासारखेच उपकेंद्राचे ब्रॅँडिंग करा

अहमदनगर : कुठल्याही शहराच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक संकुलाचा मोठा वाटा असतो़ पुणे विद्यापीठाची आज जगात ओळख आहे़ नगरचे उपकेंद्र केवळ नावापुरतेच न राहाता त्याचे पुणे विद्यापीठासारखेच ब्रँडिंग करा, असे आवाहन कुलगुरू डॉ़ वासुदेव गाडे यांनी केले़
नगर शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे सिनेट सदस्य, विद्यापीठ उपकेंद्र सल्लागार समिती व विविध महाविद्यालयातील प्राचार्य यांच्यासमवेत आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते़ यावेळी उपकेंद्राचे संचालक डॉ़ बळवंत नागवडे, सिनेट सदस्य प्रशांत गडाख, शिवाजीराव साबळे, कुलसचिव नरेंद्र कडू, संजीव सोनवणे, प्रा़ अशोक चासकर, शर्मिला चौधरी, दत्तात्रय बाळसराफ, उपकेंद्र सल्लागार समितीचे अध्यक्ष युवराज नरवडे, प्राचार्य भास्कर झावरे, अ‍ॅड़ अभय आगरकर आदी उपस्थित होते़ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्रास मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ वासुदेव गाडे प्रथमच नगर येथे आले होते़ यावेळी उपकेंद्राच्या पुढील नियोजनासंदर्भात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते़
डॉ़ गाडे म्हणाले की, उपकेंद्राच्या मंजुरीसाठी सर्वांचेच मोठे योगदान आहे़ उपकेंद्र उभारणीत सिनेट सदस्य, सल्लागार समिती व स्थानिक लोकप्रतिनिधींची मोठी जबाबदारी आहे़ नगर येथे दर्जेदार शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्यासाठी वेळ आणि पैशाचा विचार न करता सर्व बाबी उत्कृष्ट कशा होतील याकडे लक्ष द्यावे़ पुणे विद्यापीठात ज्याप्रमाणे देशासह विदेशातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात तसेच नगर येथे येतील त्यासाठी तज्ज्ञांना संधी, संशोधनाला महत्त्व द्यावे असे सांगत डॉ़ गाडे म्हणाले की, सल्लागार समितीच्यावीने जे प्रस्ताव पाठविले जातील त्याला मान्यता दिली जाईल़ शैक्षणिक संकुलातून विद्यार्थ्यांना आवश्यक ते कौशल्य शिकविले जाणे गरजेचे आहे़
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच नोकरीची संधी कशी मिळेल या बाबीचा विचार करून काही अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून, येथील उपकेंद्रातही या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे़ विद्यार्थिंनीमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होत असून, यासह आरोग्याच्या अनेक अडचणी असतात़ त्यासाठी पुणे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करून त्यांना मेडिकल सेवा पुरविण्यात येणार असल्याचे कुलगुरू म्हणाले़
यावेळी उपकेंद्र संचालक डॉ़ बळवंत नागवडे, प्रशांत गडाख, नरेंद्र कडू, प्रा़ अशोक चासकर, डॉ़ लवांडे, व्ही़बी़ गायकवाड, सुभाष कडलग यांनी उपकेंद्राविषयी आपल्या संकल्पना मांडल्या़
(प्रतिनिधी)

Web Title: Branding sub-center like university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.