राहुरी : प्रियकराने प्रेयसीचा निघृण खून केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात बुधवारी रात्री उशिरा घडली. घटनेनंतर आरोपी प्रियकर स्वतः वांबोरी येथील पोलिस चौकीत हजर झाला. मयत आणि आरोपी दोघे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आहेत. सोनाली राजू जाधव असं खून झालेल्या २८ वर्षीय तरुणीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सोनाली राजू जाधव व ५३ वर्षीय सखाराम धोंडिबा वालकोळी यांच्यात अनैतिक संबंध होते. दोघे जण काही काळ पती-पत्नी सारखे राहत होते. काही दिवसांपूर्वी मयत सोनाली ही प्रियकर सखाराम याला सोडून तिच्या पतीकडे गेली होती. त्यानंतर तिने पुन्हा सखाराम याला फोन करून मला तुझ्याकडे यायचे आहे, मला पैसे दे, मी पती सोबत गेले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तसेच तू मला नाही सांभाळले तर मी तुला सोडणार नाही. तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिली. त्यामुळे सखाराम तिच्या धमकीला वैतागला होता. त्यातून त्याने हे कृत्य केले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आदींसह पोलिस पथक घटनास्थळी गेले. मयत सोनाली हिचे धड व धडापासून वेगळे झालेले शिर ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. राहुरी पोलिसांनी आरोपी सखाराम वालकोळी याला अटक केली. पोलिस नाईक सुनील निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
कोयत्याने शीर धडावेगळेबुधवारी सायंकाळी सोनाली पुणे येथून अहिल्यानगर येथे आली. बसस्थानकावर दोघांची भेट झाली. त्यानंतर सखाराम हा सोनाली हिला घेऊन वांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदीरा शेजारच्या डोंगराजवळ आला. रात्री त्या दोघांमध्ये वाद झाला आणि सखाराम याने सोनाली हिला लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली. त्यानंतर त्याने कोयत्याने सोनालीवर वार करून तिचे शीर धडापासून वेगळे केले. त्यानंतर आरोपी सखाराम स्वतः वांबोरी पोलिस चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबुली दिली.