शेवगाव पोलिसांच्या जाचाला कंटाळून मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:13+5:302021-09-09T04:27:13+5:30

शेवगाव : पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेऊन पुन्हा घरी सोडलेल्या मुलाने पोलिसांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली, ...

Boy commits suicide after being harassed by Shevgaon police | शेवगाव पोलिसांच्या जाचाला कंटाळून मुलाची आत्महत्या

शेवगाव पोलिसांच्या जाचाला कंटाळून मुलाची आत्महत्या

शेवगाव : पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेऊन पुन्हा घरी सोडलेल्या मुलाने पोलिसांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली, असा आरोप मयत मुलाच्या नातेवाइकांनी केला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करून बुधवारी (दि.८) दुपारी शेवगाव पोलीस ठाण्यात आणलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी मी स्वतः या प्रकरणाचा तपास करतो. मुलाच्या आईची फिर्याद दाखल करून जबाब देतेवेळी चित्रीकरण केले जाईल. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

आदित्य अरुण भोंगळे (रा. बालमटाकळी, ता. शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

आदित्य भोंगळे यास काही दिवसांपूर्वी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून तपासकामी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही काळाने त्याला घरी आणून सोडले. त्यावेळी आदित्य अतिशय भयभीत होता. त्याने त्याचा आईला पोलिसांनी खूप मारल्याचे व भीती वाटते, असे सांगितले. यावेळी आईने त्यास काळजी करू नकोस आपण त्यांना समजून सांगू, असे सांगितले. दरम्यान आदित्यने त्याच्या आईकडून बचतगटाचे ५० हजार रुपये घेऊन कोणाला तरी दिले आहेत. पोलीस पुन्हा येणार आहेत असे त्याला कोणीतरी सांगितल्याने तो अधिकच घाबरलेला होता, असे त्याच्या आईने सांगितले.

मंगळवारी सायंकाळी मित्राकडे जाऊन येतो असे आईला सांगून तो बाहेर पडला. स्वयंपाक झाल्याने त्याची आई त्यास शोधण्यासाठी बाहेर आली असता घराच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या घरात आदित्य लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

दरम्यान, त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केल्याने भयभीत झालेल्या त्याने आत्महत्या केली आहे. त्याने ज्यांना रोकड दिली व मोबाइलवरून पैसे पाठविले. त्या व्यक्तीचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. अविनाश मगरे यांनी केली. यावेळी माजी सभापती प्रकाशबापू भोसले, नगरसेवक कैलास तिजोरे, बाळासाहेब गायकवाड, पवन साळवे, विनय बोरुडे, भाऊ भोंगळे आदी उपस्थित होते.

Web Title: Boy commits suicide after being harassed by Shevgaon police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.