जामखेडमधील पाण्याच्या टाकीत तरूणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 18:42 IST2018-06-06T18:41:52+5:302018-06-06T18:42:09+5:30
शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील नियोजित दवाखान्याचे अर्धवट अवस्थेत असलेल्या बांधकामाच्या पाण्याच्या टाकीत इस्माईल उस्मान सय्यद (वय ३८, सदाफुले वस्ती) या तरूणाचा मृतदेह मंगळवारी आढळल्याने खळबळ उडाली.

जामखेडमधील पाण्याच्या टाकीत तरूणाचा मृतदेह
जामखेड : शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील नियोजित दवाखान्याचे अर्धवट अवस्थेत असलेल्या बांधकामाच्या पाण्याच्या टाकीत इस्माईल उस्मान सय्यद (वय ३८, सदाफुले वस्ती) या तरूणाचा मृतदेह मंगळवारी आढळल्याने खळबळ उडाली.
इस्माईल मोलमजुरी किंवा बसस्थानकात चणे-फुटाणे विकून उदरनिर्वाह करीत होता. ३ जूनपासून तो बेपत्ता होता. बसस्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस नवीन दवाखान्याच्या बांधकामाच्या ठिकाणी त्याची चप्पल व कपडे आढळले. त्याच्या पत्नीस संशय आल्याने ती कपडे सापडले तेथे शोध घेत होती. तेव्हा तिला पतीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे ही टाकी पाण्याने भरली होती. एका टाकीत रक्ताळलेले पाणी पाहून नातेवाईकांना संशय आला. याबाबत पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलीस कॉँस्टेबल बापू गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी इंजिन लावून टाकीतील पाणी काढले असता इस्माईलचा मृतदेह दिसला. नागरिकांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला. मयत इस्माईल सय्यद यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा कब्रस्थानमध्ये दफनविधी पार पडला.