चंदनापुरी घाटात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू
By शेखर पानसरे | Updated: September 25, 2023 13:38 IST2023-09-25T13:38:14+5:302023-09-25T13:38:30+5:30
डोक्यात दगड घालून केला खून

चंदनापुरी घाटात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू
संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील जुन्या चंदनापुरी घाटात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या मुलीचा खून झाल्याचे समोर आले असून त्यानंतर घाटात तिचा मृतदेह फेकून देण्यात आला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. १५ वर्षीय मुलगी संगमनेर शहरातील रहिवासी आहे. रविवारी (दि.२४) दुपारी चार वाजेच्या सुमारास चंदनापुरी घाटात मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे हे घटनास्थळी पोहोचले. मयत अल्पवयीन मुलीच्या मारेकऱ्याने तिचा चेहरा ओळखला जावू नये, याकरिता तिच्या डोक्यात दगड घातले. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ढुमणे अधिक तपास करीत आहेत.