अंगावर ट्रॅक्टर घालून महिलेचा खून
By Admin | Updated: July 29, 2014 01:04 IST2014-07-28T23:32:40+5:302014-07-29T01:04:51+5:30
आश्वी : शेतजमीन नांगरण्यास विरोध करणाऱ्या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिचा खून करण्यात आल्याची घटना ओझर बुद्रूक येथे घडली.

अंगावर ट्रॅक्टर घालून महिलेचा खून
आश्वी : शेतजमीन नांगरण्यास विरोध करणाऱ्या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिचा खून करण्यात आल्याची घटना ओझर बुद्रूक येथे घडली. यावेळी झालेल्या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले.
ओझर बुद्रूक येथील सखाराम भिवा नागरे व हरिभाऊ रामभाऊ कांगणे यांच्यात गट नंबर १११ मधील जमिनीवरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हरिभाऊ कांगणे, संदीप हरिभाऊ कांगणे, राजेंद्र हरिभाऊ कांगणे, जालिंदर सदाशिव सांगळे, दशरथ रामनाथ नागरे, मीना अर्जुन कांगणे, अरूणा दशरथ नागरे, हौसाबाई हरिभाऊ कांगणे, यमुनाबाई सदाशिव सांगळे, मथुरा घुगे, आशा कांगणे, रमेश कुटे हे सर्वजण गट नंबर १११/१ मध्ये जमीन नांगरण्यास गेले. याचवेळी सखाराम भिवा नागरे, मारूती लहानू नागरे, पार्वताबाई सखाराम नागरे, अनिता बाळासाहेब नागरे, रंजना मारूती नागरे, कौसाबाई लक्ष्मण सानप, बाळासाहेब सखाराम नागरे हे चारा काढण्यासाठी तेथे आले. उभे बाजरीचे पीक कांगणे कुटुंबीय नांगरत असल्याचे पाहून नागरे कुटुंबीयांनी त्यांना विरोध केला. दोन्ही गटात वाद सुरू होताच हरिभाऊ कांगणे यांनी हातातील कुऱ्हाडीने अनिता नागरे यांच्या डोक्यात घाव घातला, तर संदीप कांगणे याने ट्रॅक्टर(क्रमांक एम.एच.१७, के.४४६) हा पार्वताबाई नागरे यांच्या अंगावर घातला. ट्रॅक्टरच्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रसंगी तुफान हाणामारी होऊन अनिता नागरे, रंजना नागरे, कौसाबाई सानप या तिघी गंभीर जखमी झाल्या.
अनिता नागरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना संगमनेरच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची खबर पोलीस पाटील सुभाष खेमनर यांनी आश्वी पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक फौजदार अशोक मोरे, उपनिरीक्षक अन्सार इमानदार, एकनाथ बर्वे, आर.टी. मोरे, बाळासाहेब यादव, कैलास ठोंबरे, संजय मंडलिक, रामचंद्र साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. (वार्ताहर)