लोकमत भवनमध्ये उद्या रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:13+5:302021-07-16T04:16:13+5:30
अहमदनगर : ‘ लोकमत ’ चे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून जिल्ह्यात ...

लोकमत भवनमध्ये उद्या रक्तदान शिबिर
अहमदनगर : ‘ लोकमत ’ चे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून जिल्ह्यात महारक्तदान अभियान राबविण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी (दि. १७ ) लोकमत भवन, पत्रकार चौक, नगर-मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर येथे रक्तदान शिबिर होणार आहे. या शिबिरात तरुण, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून रक्तदान होत नसल्याने राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जूनपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून थांबलेल्या विविध आजारांवरील शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. राज्यभरात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. हीच रक्ताची गरज लक्षात घेऊन लोकमत समूहाने २ जुलैपासून ‘रक्ताचं नातं’ हे महारक्तदान अभियान राबविले आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी होणाऱ्या रक्तदान शिबिरात ही नागरिकांनी रक्तदान करून रुग्णांना जीवन दान द्यावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराकडून करण्यात येत आहे.
-----------
गुरू सुपर मार्केटतर्फे गुळाचे वाटप
लोकमतने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना गुळ भेट दिला जाणार आहे. यासाठी गुरु सुपर मार्केटचे संचालक जयराम गाबरा व सुनील गाबरा यांनी सांगितले. महारक्तदान अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडून ही गुळाची भेट दिली जाणार आहे. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी गूळ खाणे फायदेशीर असते. गुळामध्ये लोहाचे प्रमाण असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेले असेल तर गुळ खाल्ल्याने हे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तदात्यांना गुळ भेट दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---
यांना करता येईल रक्तदान
१) कोरोनातून बरे झाल्यानंतर ४५ दिवसांनी
२) पहिली किंवा दुसरी लस घेतल्यानंतर १५ दिवसांनी
३) १८ ते ६५ वर्षे वयापर्यंतच्या कोणालाही
४)वजन ४५ किलोपेक्षा जास्त व हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ टक्केपेक्षा जास्त
------------
लोकमत रक्तदान लोगो