नगरमध्ये ‘अंधा कानून’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:39 IST2018-05-17T12:28:54+5:302018-05-17T12:39:49+5:30
असे म्हणतात कायदा सर्वांनाच सारखा असतो़ माजी आमदार अनिल राठोड मात्र याला अपवाद ठरले आहेत. केडगाव तोडफोड प्रकरणात राठोड यांच्यावर गुन्हा दाखल आहे़. पोलीस मात्र त्यांना अटक करण्याचे सोडून त्यांच्याच मांडीला मांडी लावून चर्चा करताना दिसत आहेत.

नगरमध्ये ‘अंधा कानून’
अहमदनगर : असे म्हणतात कायदा सर्वांनाच सारखा असतो़ माजी आमदार अनिल राठोड मात्र याला अपवाद ठरले आहेत. केडगाव तोडफोड प्रकरणात राठोड यांच्यावर गुन्हा दाखल आहे़. पोलीस मात्र त्यांना अटक करण्याचे सोडून त्यांच्याच मांडीला मांडी लावून चर्चा करताना दिसत आहेत. राठोड आणि पोलीस अधिकाऱ्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर घटनास्थळी जमावाने मोठी तोडफोड केली. याप्रकरणी ९ एप्रिल रोजी राठोड यांच्यासह इतर ६०० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १७ जणांना अटक केली असून, त्यांना जामीनही मिळाला आहे.
राठोड यांना मात्र पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेली नाही़ कायदा हा सर्वांनाच सारखा असेल तर राठोड यांना पोलिसांकडून का अभय मिळत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. केडगाव येथे मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील हे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. तेथे राठोड उपस्थित होते. राठोड यांनी पाटील यांच्या शेजारी बसून चर्चा केली. उपोषण सुटल्यानंतर पोलीस अधिकारी निघून आले तर राठोडही निघून गेले. पोलिसांच्या या कृतीवर ‘ये अंधा काूनन है’ असेच म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.