कोरोना तपासणी किटचाही काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:22 IST2021-04-21T04:22:01+5:302021-04-21T04:22:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तिसगाव : कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याची प्रकरणे समाेर येत असतानाच आता पाथर्डी तालुक्यात ...

कोरोना तपासणी किटचाही काळाबाजार
लोकमत न्यूज नेटवर्क
तिसगाव : कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याची प्रकरणे समाेर येत असतानाच आता पाथर्डी तालुक्यात कोरोना तपासणी किटचाही काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने त्यास दुजाेरा दिला असून, लवकरच कारवाईचे संकेत दिले आहेत.
वैद्यक परिषद नियमावलीनुसार नोंदणीकृत असलेल्या तंत्रज्ञांना कोरोना व इतर गंभीर आजारांची तपासणी करता येते. निदान अर्हताप्राप्त एम. डी. तंत्रज्ञ करतात. यासाठीचा अधिकृत परवाना वैद्यक परिषदेकडून दिला जातो. मात्र, पाथर्डी तालुक्यातून केवळ एकाच व्यक्तीने अशा परवान्यासाठी प्रस्ताव केला असून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. असे असतानाही तालुक्यात सर्रास खाजगी प्रयोगशाळांत कोरोनाच्या तपासण्या उघडपणे सुरू आहेत. अधिकृत निदानपत्र देण्यास टाळाटाळ करून केवळ तोंडी सांगितले जात आहे. खासगीतील रिपोर्ट शासकीय यंत्रणेकडे जात नसल्यामुळे या रुग्णांची शासकीय पातळीवर कोठेही नोंद होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या आकडेवारीबाबत संभ्रमावस्था आहे. सरकारी तपासणी केंद्रातील निदानपत्र पुढील उपचारासाठी ग्राह्य मानले जाते. खाजगी प्रयोगशाळांत तपासणी केली तरी निदानपत्र मिळत नसल्याने रुग्णांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. खासगी प्रयोगशाळांना तपासणीसह निदानाचे अधिकार नाहीत. तरीसुद्धा त्यांना तपासणीसाठी काळ्या बाजाराने तपासणी किट उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याबाबत आरोग्य विभागाकडेही तक्रारी झालेल्या आहेत.
........
खाजगी प्रयोगशाळा व तंत्रज्ञ यांच्या कार्यप्रणालीबाबत आरोग्य विभागाकडे तक्रारी आहेत. त्यांच्यावर कारवाईची मोहीम राबवायची आहे. पाथर्डीत दोन ठिकाणी तर तिसगाव येथे केवळ एक खाजगी तपासणी केंद्र प्राधिकृत आहे.
-डॉ. भगवान दराडे, तालुका आरोग्य अधिकारी